ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्यांच्यावर उपचाराची गरज आहे. आता त्यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू, खा. राऊतांनी जे आरोप केले ते सिद्ध करावे.
आरोप सिद्ध झाले तर राजकीय संन्यास घेऊ. असा पलटवार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात पालकमंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.२२) संभाव्य टंचाई परिस्थितीची आढावा बैठक संपन्न झाली. या दरम्यान पत्रकारांशी बोलताना ना. विखे यांनी खा. राऊत यांच्यावर टिकास्त्र सोडले.
बैठकीस खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, माजी मंत्री आ.राम शिंदे, आ. मोनिकाताई राजळे, आ. प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह सर्व प्रातांधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि विभाग प्रमुख, यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, संभाव्य टंचाई परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकरच्या खेपा व पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार करण्यात येईल.
उद्भवाच्या ठिकाणी विजेअभावी टँकर भरण्याचा खोळंबा होऊ नये, यासाठी जनरेटर तैनात ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
टंचाईच्या परिस्थितीत पशुधनाच्या छावण्या सुरू केल्या जाणार नाहीत. मात्र, जिल्ह्यातील पशुधनाला मुबलक प्रमाणात आवश्यकतेनुसार चारा पुरवठा करण्यासाठी चारा डेपो सुरू केले जातील. मॅपिंग नुसारच डेपो सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जेणेकरून पशुपालक शेतकऱ्यांना चारा वाहतुकीसाठी त्रास होऊ नये, याची काळजी घेतली जाईल. जिल्’ात सध्या रोजगार हमी योजनेअंतर्गत १८६१ कामे मंजूर असून जिल्ह्यात रोहयो कामावर १० हजार ३६५ मजूर काम करत आहेत.
जिल्ह्यात एकूण रोजगार हमी योजनेअंतर्गत २५ हजार ६६ लाख रोजगार क्षमतेची कामे मंजूर असल्याचे त्यांनी सांगितले. कुकडी आवर्तनाचा निर्णय शनिवारी (दि.२४) रोजी पुणे येथे होणाऱ्या बैठकीत होईल, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संदर्भातील तक्रारींचे एकत्रित संकलन करून त्यावर राज्यस्तरीय बैठकीत झाडाझडती घेणार असल्याचे सांगून ना. विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा आवश्यक आहे.
पैसा व्यर्थ जाऊ नये याची काळजी घेतली जाईल. निळवंडेच्या वितरिका बंद पाईपच्या असाव्यात. त्यासंदर्भात आराखडा तयार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. विभागस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून ना. विखे पाटील म्हणाले.
या मेळाव्यात साधारणपणे ४०० कंपन्या येतील, असे प्रयत्न केले जात आहेत. हा मेळावा केवळ कंपन्यांच्या स्टॉल पुरता मर्यादित न राहाता मेळाव्यातून युवकांना प्रत्यक्ष नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढाव्या यासाठी अहमदनगर एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी नव्याने जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच बेलवंडी आणि शिर्डी येथे दोन स्वतंत्र एमआयडीसीसाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यात गुंतवणुकीचा वेग वाढला असून नव्याने येणाऱ्या कंपन्या आणि त्यांची गुंतवणूक नगर जिल्ह्यात व्हावी. उद्योग जिल्ह्याकडे आकर्षित होतील असे प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. साकळाई योजनेचे काम समन्वयाने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.
उमाजी नाईक महामंडळाचे दाखले संबंधित लाभार्थ्यांना विनाविलंब मिळावे, यासाठी मिशन मोडवर काम केले जाईल, असे नमूद करीत ना. विखे पाटील म्हणाले, दुधाच्या अनुदाना संदर्भात टेगिंग करावेच लागेल. त्यासाठी विभागाचे जेथे मनुष्यबळ अपुरे आहे तेथे इतरत्र असलेले मनुष्यबळ पुरवले जाईल.