Ahmednagar News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारमार्फत अनेकविध योजना जिल्ह्यासह पारनेर तालुक्यात राबविण्यात येत आहेत. त्या योजनांचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला असून,
यापुढेदेखील अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचण्यासाठी आपण कटिबध्द आहोत, अशी ग्वाही खा. डॉ. सुजय विखे यांनी दिली.
कर्जुले हरेश्वर, ता. पारनेर येथे ३.६८ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला, या वेळी ते बोलत होते. या वेळी विखे यांचे ग्रामस्थांनी ढोलताशाच्या गजरात तसेच जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत केले.
याबद्दल खा. विखे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. याप्रसंगी विश्वनाथ कोरडे, पत्रकार शिवाजी शिर्के, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, शिवसेना तालुकाध्यक्ष विकास रोहकले, डॉ. भाऊसाहेब खिलारी, सरपंच सौ. संजीवनी आंधळे, मिलिंद शिर्के,
पंकज काटखिले, बाबासाहेब खिलारी, दत्ता नाना पवार, गंगाराम रोहकले, शिवाजी रोकडे, मनोज मुंगसे, प्रकाश दानगे, नितीन आंधळे, लहू भालेकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
खा. विखे पुढे म्हणाले की, मागीला दीड वर्षांत राज्यात भाजप महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यासह पारनेर तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.
उन्हातान्हात डोक्यावर हंडा घेऊन पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या महिला भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरवून त्यांना नळाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना राबवून महिलांची होणारी पायपीट थांबविली आहे.
केवळ पारनेर तालुक्यातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील पाण्याचा प्रश्न मिटविण्याचे श्रेय हे खऱ्या अर्थाने पंतप्रधानांना जाते. त्यामुळे कामाचे श्रेय घेणाऱ्यांनी घ्यावे; परंतु आमचे नेते नरेंद्र मोदी आहेत, असे जनतेला सांगावे, किमान विकासकामांचे श्रेय घेताना ज्यांनी सदर योजना सुरू केल्या आहेत,
त्यांचा फोटो तरी लावावा, कारण गोरगरिबांना पिण्याचे पाणी देण्याचे काम हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात होत आहे, याची जाणीव त्यांनी ठेवावी, असे डॉ. विखे यांनी बोलताना स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, सध्या कोण कोणाच्या पाठीशी आणि कोण कोणाच्या गाडीत बसलायं, याचा थांगपत्तादेखील कुणाला आजकाल लागत नाही, असा चिमटा काढत आजच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले.