अहमदनगर बातम्या

अहिल्यानगर शहरातील पतंग व मांजा विक्रेत्यांना महानगरपालिकेच्या नोटिसा! नायलॉन मांजा आढळल्यास २५ हजारांचा दंड करणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

अहिल्यानगर – शहरातील पतंग व मांजा विक्रेत्यांना अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नायलॉन मांजा विक्री न करण्याबाबत, कायद्याचे पालन करण्याबाबत प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

तोफखाना, बागडपट्टी यासह शहरातील ज्या ज्या ठिकाणी पतंग व मांजा विक्री होते, तेथे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नायलॉन मांजा विक्री करताना आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून २५ हजारांचा दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

मकरसंक्रांतीचा सण जवळ आला आहे. या दिवशी व त्याच्या लगतच्या दिवसात पतंग शौकिनांकडून मोठ्या प्रमाणात पतंगबाजी केली जाते. काटाकाटीच्या स्पर्धेत अव्वल ठरण्यासाठी काही जण नागरीक व पशूपक्ष्यांसाठी धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर करतात. या मांजाच्या वापरामुळे अनेक जण जखमी झाले आहेत.

अनेक पशुपक्षी मृत्युमुखी पडलेत. दरवर्षी कमी अधिक प्रमाणात या घटना घडत असतात. त्यामुळे आपल्या राज्यात या नायलॉन मांजाचा वापर प्रतिबंधित आहे. नागरिकांनी या नायलॉन मांजाचा वापर करू नये, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

तसेच, अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात पतंग व मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनीही सामाजिक भान राखावे. बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करू नये. या मांजाची विक्री करताना, बाळगताना आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल.

तसेच, महानगरपालिकेच्या वतीने संबंधित विक्रेत्यांवर, मांजा बाळगणाऱ्यास २५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे. जानेवारी अखेरपर्यंत महानगरपालिकेकडून तपासणी व कारवाई सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts