महापालिका स्थायी समिती सभापती करणार उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :- महापालिकेच्या विद्युत विभागाला विभाग प्रमुखच नसल्यामुळे शहरातील पथदिव्यांसाठीचा स्मार्ट एलईडी प्रकल्प गेल्या वर्षभरापासून रखडला आहे. ठिकठिकाणी पथदिवे बंद आहेत.

नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला पदाधिकारी व नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. पथदिवे सुरु नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देत येत नसल्याने नगरसेवक हैराण झाले आहे. दरम्यान नगर महापालिकेच्या विद्युत विभागाला तातडीने पूर्ण वेळ विभाग प्रमुख असावा या मागणीसाठी मंगळवारी (दि.29) पासून आयुक्त कार्यालयात उपोषणास बसण्याचा इशारा स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी दिला आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी (दि.28) दुपारी सभापती कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत शहरातील बंद पथदिव्यांचा विषय चर्चेला आला.

पदाधिकारी, नगरसेवक वारंवार मागणी करत असतानाही प्रशासनाकडून शहरातील पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम करण्यास टाळाटाळ होत आहे.

या विभागाला विभाग प्रमुखच नसल्याने स्मार्ट एलईडी प्रकल्पही रखडला आहे. त्यामुळे आपण मंगळवारी (दि.29) उपोषणास बसणार असल्याचे सभापती कोतकर यांनी यावेळी जाहीर केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts