अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar Politics :- राज्यातील राजकारणातून एक अत्यंत महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आता आयटीच्या रडारवर आले आहेत.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संबंधित साखर कारखान्याची लाचलुचपत विभाग चौकशी करत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली.
त्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावरही ईडीने कारवाई करून त्यांना अटक केली. तर, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूर राम गणेश गडकरी साखर कारखान्यावर कारवाई करून ईडीने १३ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली.
आता यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील एक महत्वाचे असलेले नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे आता आयटीच्या रडारवर आले आहे.
मंत्री हसन मुश्रीफ महालक्ष्मी एक्स्प्रेसने सकाळी मुंबईहून कोल्हापूरला आले. सकाळी ते कागलमधील निवासस्थानी पोहोचले.
त्यानंतर काही वेळातच प्राप्तिकर विभागाने ही कारवाई सुरू केली. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात सर सेनापती संताजीराव घोरपडे सहकारी साखर कारखाना आहे.
हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ हे सध्या या साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. प्राप्तिकर विभागाने मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थान आणि या साखर कारखान्यावरही छापा टाकला आहे.
नेमके प्रकरण काय आहे? जाणून घ्या मंत्री मुश्रीफ यांनी पदाचा गैरवापर करत साखर कारखान्याला निधी दिल्याचा आरोप ठेवण्यात आहे. हा कारखाना उभा करण्यासाठी मुश्रीफ यांनी पदाचा गैरवापर केला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही महिन्यांपूर्वी लाचलुचपत विभागाकडे मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आता कोल्हापूर लाचलुचपत पथक या कारखान्याची चौकशी करत आहे.