अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना तालुक्यातील सभासदांना यावर्षीचा जिल्ह्यातील इतर सहकारी साखर कारखान्यापेक्षा सर्वात जास्त भाव म्हणजे दोन हजार सहाशे रुपये देणार आहे,
अशी माहिती नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. कारखाना कार्यस्थळावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कारखान्याचे अध्यक्ष नागवडे म्हणाले, जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी दोन हजार पाचशेच्या आत बाजारभाव दिला आहे.
त्यांच्यापेक्षा अधिकचा भाव म्हणून नागवडे कारखान्याने यावर्षीचा सन २०२१-२२ च्या सभासंदाच्या ऊसाला एफआरपी २ हजार ४९० रुपये पेक्षा (११०) एकशे दहा रुपये जास्त असा एकूण २ हजार ६०० रुपये देणार आहोत.बाजारपेठेत साखरेचे बाजारभाव वाढले, पुन्हा कमी झाले.
सभासदांच्या उसाला जास्त भाव देण्यासाठी साखरेला बाजारपेठेत जास्त भाव मिळाला. तर सभासदांना जास्त भाव देता येईल, परंतु तसे होताना दिसत नाही. म्हणून यावर्षी कारखान्याने आठ लाख टन उसाचे गाळप करण्याचे ध्येय ठेवले आहे.
इथेनॉल बंद आहे. ते लवकरात लवकर जानेवारीपर्यत सुरू करण्यात येईल. यासाठी सभासदांनी तालुक्यातील जास्तीत जास्त ऊस नागवडे सहकारी साखर कारखान्याला दिला, तर कारखाना फेब्रुवारी २०२२ पर्यंत चालेल.
कारखान्याची गाळप क्षमता पाच हजार इतकी आहे, ती भविष्यात सात हजार टनापर्यंत नेणार असल्याचे नागवडे म्हणाले. एफआरपीची रक्कम २ हजार ६०० मधून पहिला हप्ता २ हजार २५० रुपये हा ३ डिसेंबर पर्यंत सभासदाच्या खात्यावर वर्ग केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावर्षी साखर कारखाने लवकर सुरू झाले असले तरी सभासद ऊस गाळपासाठी जास्त घाई करत आहेत.परंतु कारखाना नियमानुसार ज्यांच्या नोंदी आहेत.त्या प्रमाणे ऊस गाळप करणार आहे.