अहमदनगर बातम्या

सर्वसामान्य नागरिकांच्या कामात कधीच राजकारण केले नाही : आमदार राम शिंदे

Ahmednagar News : सर्वसामान्य नागरिकांच्या कामात, अडचणीत असलेल्या लोकांना अडचणीतून बाहेर काढताना कधीच राजकारण केले नाही. जिथे मागणी असेल तिथे जीव ओतून पाठपुरावा केला. रस्त्याला तीन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी आणला. जनतेसाठी कुठेही कधीही कमी पडणार नाही, असे माजी मंत्री आ. राम शिंदे यांनी सांगितले.

रस्ता नसल्याने ऊस वाहतुकीची मोठी अडचण होत होती. माळवाडी वस्तीवर मोठी लोकवस्ती असून, हा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. या रस्त्याबाबत लोकांची मागणी होती. नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात आमदार शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांतून बांधकाम विभागांतर्गत गणेशवाडी ते माळवाडी रस्त्यासाठी तब्बल तीन कोटी पन्नास लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला.

उजनी धरणामुळे पुनर्वसित झालेल्या गणेशवाडी-माळवाडी रस्त्याचे भाग्य आमदार शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे उजळले आहे. गणेशवाडीच्या हद्दीतील ८०० लोकवस्ती असलेला हा दुर्लक्षित भाग भक्कम डांबरीकरणाने जोडला जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांसह गावाकऱ्यांचा प्रवास सुखकर होईल.

माळवाडी भीमा नदीलगत असल्याने तेथे ऊस शेती आहे. मात्र, उसाच्या जड वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होतो. ऊसाने भरलेल्या ट्रॉल्या ओढताना रस्त्यावर ट्रॅक्टरची चाके फिरून मोठे खड्डे पडतात.

अरुंद रस्त्यात दोन वाहने बसत नव्हती. रस्त्याची ही बाब ग्रामस्थांनी आणि अंबालिका शुगर फॅक्टरीचे सिव्हिल इंजिनिअर बापूसाहेब खताळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली.

त्याअनुषंगाने आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. आता हा रस्ता गुळगुळीत होणार असल्याने गणेशवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, या प्रलंबित रस्त्याचे काम मार्गी लागल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे. रस्त्याच्या कामास लवकरात लवकर प्रारंभ करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts