१३ जानेवारी २०२५ शिर्डी : विधानसभेला महाविकास आघाडीतील तीनही पक्षाला जनतेने नाकारले आहे.ते आता निवडणुका स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, त्याची आम्हाला चिंता नाही,अशा शब्दांत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या स्वबळाच्या घोषणेवर भाष्य केले.शिर्डीत भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे.अधिवेशन स्थळाचा आज विखे पाटील यांनी आढावा घेतला.त्या वेळी ते बोलत होते.
राज्यामध्ये जो विजय आम्हाला विधानसभेला मिळाला,तोच विजय आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आगामी महापालिका निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याचे खा. संजय राऊत त्यांनी सांगितले.त्यावर विखे पाटील म्हणाले, की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येसुद्धा भाजपला महाविजय मिळवायचा आहे.या निवडणुकांच्या दृष्टीने रणशिंग फुंकले जाणार आहे.
मी मागेच म्हणालो होतो, की महाविकास आघाडीची बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही.महाविकास आघाडीचे लोक भूमिका आणि तत्व यासाठी एकत्र आलेले नाहीत.महाविकास आघाडीची सत्तेत येण्याची धडपड होती,अशी टीका त्यांनी केली.कोणी हिंदुत्व सोडले.कोणी आपल्या विचारधारेला बाजूला ठेवले.
सत्ता गेल्याबरोबर महाविकास आघाडीतील मतभेद समोर यायला सुरुवात झाली.काँग्रेस उबाठाबद्दल बोलते,उबाठा राष्ट्रवादीबद्दल चर्चा करते,असे म्हणत विखे पाटलांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून तिन्ही पक्षांनी सत्तेच्या लालसेसाठी सत्ता स्थापन केली होती.
निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करून त्यांनी विजय संपादन केला होता; मात्र ते नेरेटिव्ह विधानसभेला चालले नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्रि पदाची स्वप्न पाहणारे घरी बसले,असा टोला त्यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांना लगावला.काँग्रेस पक्षाची दुरवस्था मी सांगण्याचे कारण नाही,असे विखे म्हणाले.
संजय राऊत यांचे संतुलन बिघडले
खा. संजय राऊत यांना फक्त मुद्दा पाहिजे असतो.त्यांनी स्वतःचे अस्तित्व गमावले आहे.ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी माध्यमांना चुकीची माहिती दिली,त्यांच्यावर कारवाई केली जाईल,असे विखे पाटील म्हणाले. खा. राऊत यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे.राऊत यांचे संतुलन बिघडल्याची टीका त्यांनी केली.आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार का, यावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.