Ahmednagar News : अभी नही, तो कभी नही, अशी परिस्थिती सध्या मराठा आरक्षणासंदर्भात निर्माण झाली असून, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणासाठी लढा देणारे संघर्षयोद्धे मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.
लाखो मराठ्यांसह पायी मुंबईकडे निघालेले जरांगे यांचे सोमवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास कारेगाव-रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजित सभेत जरांगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मराठा समाज एक होऊ नये, यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले होते. पण पाठबळ कसे उभे करायचे हे मराठ्यांनी दाखवून दिले, असे जरांगे यांनी सांगत ही एकजूट तुटू देऊ नका, तुमच्या आशीर्वादाच्या बळावरच मी मुंबईला चाललो असून, परत येईन की नाही हे मला माहिती नाही.
मला दगाफटका झाला तरी तुम्ही आरक्षणाचे आंदोलन सुरू ठेवा. माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण आता आरक्षण मिळाल्याशिवाय मी माघार घेणार नाही. तुम्हीच माझे कुटुंब असून, माझ्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याचे आवाहन जरांगे यांनी यावेळी केले.