Ahmednagar News : मराठा समाजाला पाहिजे तसे आरक्षण न दिल्याने व मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी लावल्याने मराठा समाज आणखी आक्रमक झाला आहे.
काल (२ मार्च) महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यातही मराठा समाजाची बैठक झाली. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले.
लोकसभेला हजारो उमेदवार
येत्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मराठा समाजाच्या वतीने हजारो उमेदवार उभे करण्याचा ठराव सकल मराठा समाजाच्या संवाद बैठकीत घेण्यात आला.
सरकारकडून मराठा समाजाची ‘सगेसोयरे’बाबत आरक्षणाची मागणी मान्य करून कायदा पारित करून आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत कुठल्याही पक्ष किंवा नेत्यांच्या सभेला जाणार नसून कोणत्याही नेत्याला मतदान करणार नाही, असा निर्णय अहमदनगरमधील मराठा बांधवांनी घेत बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर केला.
गुलमोहोर रोडवरील कोहिनूर मंगल कार्यालयात शनिवारी दुपारी सकल मराठा समाजाने बैठक आयोजित केली होती. बैठकीनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर सर्वांनी सभेला न जाण्याची व मतदान न करण्याची शपथ घेतली.
आता समोर आलेल्या या लोकसभेला अहमदनगर जिल्ह्यातून मराठा समाजाच्या वतीने हजारो उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलेला आहे.
पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना जरांगे पाटलांनी कधीही महिलांचा अवमान केला नाही, तरीही त्यांच्याविरुद्ध षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला.
राज्य सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण कोर्टात टिकणार नाही, त्यामुळे ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर ठाम असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची एसआयटी चौकशीची मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अपहाराचे आरोप आहेत. त्यांची एसआयटी चौकशी न करता त्यांना सरकारमध्ये सहभागी करुन घेतले.
त्याउलट आंदोलन दडपण्यासाठी मराठ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या जरांगे पाटलांची एसआयटी चौकशी लावली. पण मराठे ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाहीत,
असा इशारा बैठकीत देण्यात आला व उपमुख्यमंत्री अजित पवारांची एसआयटी चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली.