Ahmednagar News : नुकताच ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी नगर जिल्हा दौरा केला. यात प्रामुख्याने अकोले तालुक्यात स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यात त्यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली. तसेच आगामी विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.
यानंतर अवघ्या तीन दिवसातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सोमवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत नगर शहर, पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेड येथे मेळावा होणार आहे.
पारनेर तालुक्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात होत आहेत. त्यानंतर दुपारी नगर शहरात मेळावा होणार आहे. शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. श्रीगोंदा येथेही मेळावा होणार असून, संध्याकाळी कर्जत येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते असल्यामुळे त्यांनी अर्थसंकल्पामध्ये अनेक समाज उपयोगी योजना जाहीर केलेल्या आहेत. त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना लोकप्रिय ठरली आहे. तिची अंमलबजावणी अतिशय चांगल्या प्रकारे झाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांसाठी असून या योजनेसंदर्भात अजित पवार हे महिलांशी संवाद साधणार असल्यामुळे काही महिलांना अजित दादांशी बोलण्याची संधी मिळणार आहे.
सदर मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्याच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह आमदार संग्राम जगताप, राज्य मार्केट कमिटीचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा, राज्य पणन महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे आदीसह कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.