सीना धरण भरण्याच्या मार्गावर ! पण लाभक्षेत्रातद्यापही दमदार पाऊस नसल्याने पाणीटंचाई

Ahmednagar News : जुलै महिन्यापासून भोसा खिंडीतून सीना धरणात कुकडीचे पाणी सुरू आहे. तसेच पाणलोटात जोरदार पाऊस झाल्याने सीना धरण ८७.०४ टक्के भरले आहे. येत्या काही दिवसांतच धरण भरेल. भोसा खिंडीतून अद्यापही कुकडीच्या पाण्याची आवक चालूच आहे.

सीना धरण पाणलोट क्षेत्र व नदीच्या उगमस्थानात आणि नगर शहर परिसरात जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यात दमदार पाऊस न झाल्याने सीना धरणात अपेक्षेप्रमाणे पाण्याची आवक झाली नव्हती.

धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची घट होऊन पाणीसाठा मृत साठ्याच्या खाली गेला होता. या दरम्यानच्या काळात कुकडी लाभक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने डिंभे, येडगाव व इतर धरणांमध्ये चांगले पाणी आले. त्यामुळे कुकडी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. त्यावेळी कुकडीचे पाणी सीना धरणात सोडण्याचा निर्णय झाला.

२९ जुलैपासून सीना धरणात कुकडीच्या पाण्याची आवक सुरू झाली. आजपर्यंत सीनात कुकडीच्या १२९०० क्युसेक पाण्याची आवक झाली. सीना नदीतून नवीन पाण्याची आवक नगण्य आहे.

सीना-मेहेकरी सिंचन प्रकल्पासाठी सीना धरणातून ४ सप्टेंबरपर्यंत २२३.०६ दशलक्ष घनफूट पाणी विद्युत पंपांनी उचलून टाकण्यात आले आहे. सीना धरणाचा एकूण पाणीसाठा २०८९.३२ दशलक्ष घनफूट (८७ टक्के) एवढा झाला आहे. धरणाची क्षमता २४००८० दशलक्ष घनफूट एवढी आहे.

लाभक्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा…
सीना धरण लाभक्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने या भागात आजही पाणीटंचाई आहे. रिमझिम पावसाने खरीप हंगामातील पिके पदरात पडली असली तरी रब्बी हंगाम आणि उन्हाळ्यात पिण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

सीना धरण ओव्हरफ्लो झाले, तर रब्बी हंगामासाठी सीना धरणातून आवर्तने मिळू शकतात. परंतु, सीना धरणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या गावांचा पिण्याचा पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts