अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- आधीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून राहिले परिणामी उभे असलेले पीक देखील नष्ट झाले.
त्यात परत सोयाबीनला मिळत असलेले अत्यंत कमी भाव आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका बसत आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरातील वंजारवाडी येथे शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, वंजारवाडी येथील दिनकर खोत, बाळू ढोले, श्रीधर ढोले यांच्या शेतावरून वीज कंपनीच्या विजवाहिन्या गेलेल्या आहेत.मात्र त्या खाली लोंबकळलेल्या आहेत. त्यामुळे वाऱ्याने त्या तारांचे एकमेकांना घर्षण झाल्याने मोठा जाळ होऊन त्याच्या ठिणग्या शेतातील उसावर पडल्या.
तोडणीसाठी आलेल्या उसावर या ठिणग्या पडल्याने काही कळायच्या आत दीड एकर ऊस जळून खाक झाला. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनी शेतात वीज वाहक तारा लटकत असल्याची वीज मंडळाकडे तक्रार केली होती.
परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. तरी या जळालेल्या ऊसाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली शासनाकडे केली आहे.