Ahmednagar News : शहरातील रेल्वे स्टेशन येथे गुरुवार दि. २८ मार्च रोजी रात्री रेल्वे गाडीतून उतरत असताना रेल्वे गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये सापडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म क्र. २ वर साईनगर एक्सप्रेस ही रेल्वे गाडी आली असता तिच्यातून उतरताना अंदाजे ६० वर्ष वय असलेला इसम रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकून गंभीररित्या जखमी झाला होता.
त्याला तत्काळ श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर मयत इसमाची ओळख पटलेली नसून मयताची उंची ५.५ फूट असून सावळा रंग, लांबट चेहरा तसेच सडपातळ शरीर आहे.
याप्रकरणी पो. कॉ. किरण शिंदे यांनी श्रीरामपूर पोलीसात दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताबाबत काही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन श्रीरामपूर पोलिसांनी केले आहे.