Ahmednagar News : राहुरी स्टेशन परिसरातील एका पेट्रोल पंपावर अनेक ग्राहकांच्या गाड्या बंद पडल्यानंतर गाड्यांच्या टाकीतील पेट्रोल तपासले असता, त्यामध्ये पाणी मिश्रित पेट्रोल असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्राहकांनी संबंधित पेट्रोल पंप चालकाला धारेवर धरले.
या प्रकाराने पंप चालकाची देखील चांगलीच तारांबळ उडाली होती. राहुरी स्टेशन रोड परिसरातील एका पंपावर काल शुक्रवारी सकाळी ग्राहकांनी आपल्या गाड्यांमधे पेट्रोल भरल्यानंतर काही काळातच या गाड्या बंद पडल्यानंतर पेट्रोल चेक केले असता, या पेट्रोलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी मिश्रित पेट्रोल असल्याचे ग्राहकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पेट्रोल पंपाकडे धाव घेऊन सर्व प्रकार पेट्रोल पंप चालकाला सांगितला.
पेट्रोल पंप चालकाने पंपावरील गर्दी लक्षात घेता, पेट्रोल मशीन तात्काळ बंद करून पंपाचे गेट देखील बंद केले. आवारातील गाड्या तेथेच लावून घेऊन त्यातील सर्व पेट्रोल काढून घेतले. त्यानंतर पंपावर तांत्रिक अडचण असल्याने पंप बंद आहे,
असा फलक गेटवर लावून सदर पेट्रोल पंप तात्पुरत्या स्वरूपात बंद केला असून अधिक तपासण्या करणे सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी याच पेट्रोल पंपावर एक प्रकार घडल्याचे समोर आले होते. त्यानंतर काल पुन्हा या ठिकाणी असा प्रकार घडल्याने हा नेमका काय प्रकार आहे,
याची चोकशी होणे गरजेचे असल्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल असल्याने इथेनॉलचा आणि पाण्याचा संपर्क झाल्यास त्या इथेनॉलचे पाणी होते. म्हणून एखाद्या वेळेस, असा देखील प्रकार होऊ शकतो. ते तपासण्याचे काम सुरू आहे.. असे पेट्रोल पंप चालकाने स्पष्टीकरण दिले आहे.