Ahmednagar News:पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांविरूद्ध एनआयएसह इतर तपास संस्थांनी देशात मध्यरात्री पुन्हा एकदा कारवाई केली. यामध्ये अहमदनगर शहर आणि संगमनेर येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याशिवाय महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक येथेही मोठी कारवाई करण्यात आली. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना देशविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे.
यावरूनच काही दिवसांपूर्वी देशभर छापेमारी करण्यात आली होती. त्याविरोधात आता आंदोलनेही सुरू झाली आहेत. त्यावरून नवा वाद उपस्थित झाला असतानाच आज मध्यरात्री तपास यंत्रणांनी कारवाईची दुसरी फेरी राबविली.
महाराष्ट्रात राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए आणि महाराष्ट्र दहशतवादी पथकाने (एटीएस) संयुक्तरित्या कारवाई केली. यामध्ये अहमदनगर, संगमनेर, मालेगाव, औरंगाबाद आणि सोलापूरमध्ये पीएफआयचे कार्यकर्ते ताब्यात घेतले आहेत.
याशिवाय आसाममध्ये ७ तर कर्नाटकात १० जणांना अटक केली आहे. यात पीएफआय आणि एसडीपीआयच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. एकूण ८ राज्यात ही छापेमारीची कारवाई केली गेली. आसाममध्ये पहाटे पाच वाजता एनआयएच्या पथकाने छापा टाकला आहे. अनेक ठिकाणी अद्याप कारवाई सुरू आहे.