अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-बिबट्याच्या भितीने वीजकंपनीला विनवणी करुन शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती त्यानुसार वीजकंपनीने सकाळी सहा ते बारा व दुपारी बारा ते सहा अशी सहा तास वीज दिली.
मात्र ग्रामीण भागात चालणाऱ्या घरगुती शेगड्या आणि वाढलेल्या वीजचोरीच्या घटनामुळे अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे वीजपंप जळाले आहेत. त्यामुळे भिक नको पण कुत्रा आवरा असा म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
परिणामी पूर्वीप्रमाणेच आठ दिवस दिवसा व आठ दिवस रात्री वीजपुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बिबट्याने तालुक्यात अनेक गावात धुमाकुळ घातला आहे. तालुक्यातील सुमारे तिस ते पस्तीस गावात बिबट्या दिसला. तिन जणांना बळी घेतला. चार जणावर हल्ले झाले.
त्यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांनी वीजपंपाला दिवसा वीज मिळावी अशी मागणी केली. वीजकंपनीने आठ तासाऐवजी सहा तास वीज देण्याचे कबुल केले व दिवसा वीज दिली. सकाळी सहा वाजता वीज पुरवठा सुरु झाला तर दहा वाजेपर्यंत वीजपंप चालत नाहीत. शेगड्यामुळे अत्यंत कमी दाबाने वीज मिळते.
दहा ते बारा या दोन तासात किती पाणी देता येईल असा प्रश्न आहे. काही भागात दुपारी बारा ते सांयकाळी सहा अशी विजेची वेळ आहे. त्यावेळीही कमी दाबाने वीज पुरवठा होतो. वीजपंप चालत नाहीत.
या काळात अनेकत शेतकऱ्यांचे वीजपंप कमी दाबावर चालवल्याने जळाले व दोन ते तिन हजार रुपयाचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. तेव्हा रात्री का वीज देईनात पण पुर्ण दाबाने द्या, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.