Ahmednagar News : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ या गळीत हंगामात १३० दिवसात ९ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून १० लाख क्किं टल साखर उत्पादित केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
याबाबत अधिक माहिती देताना ओहोळ म्हणाले, कार्यक्षेत्र व परिसरात झालेल्या कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे चालू हंगामासाठी ऊसाची उपलब्धता कमी असल्यामुळे गळीत हंगाम १०० दिवस ही चालणार नाही, असे चित्र दिसत होते. परंतु मध्यंतरी आलेल्या पावसामुळे हंगामाच्या दिवसात वाढ झाली. हेक्टरी ऊस उत्पादनातही १५ ते २० टन वाढ झालेली आहे.
हा हंगाम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालण्याचा अंदाज असून एकूण ऊस गाळप १० लाख मेट्रिक टना पर्यंत जाईल. चालू हंगामात ८ कोटी १८ लाख युनिट वीज उत्पादन करून ५ कोटी ३६ लाख युनिट वीज मंडळात सात रुपये नऊ पैसे या दराने विक्री करण्यात आलेली आहे. दैनंदिन साखर उतारा १२.८० टक्के असून सरासरी साखर उतारा ११.३५ टक्के मिळाला आहे.
पुढील हंगामात जास्तीत जास्त लागवड करण्यासाठी कारखान्याने १५० रुपये प्रतिरोप या दराने व नवीन लागवडीसाठी अमृत शक्ती दाणेदार खत सवलतीच्या दराने देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचा फायदा ऊस उत्पादकांनी घेऊन जास्तीत जास्त खोडवा पीक ठेवून नवीन ऊस लागवड क्षेत्रात वाढ करावी, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.