अहमदनगर बातम्या

पुणेवाडी वीज उपकेंद्राचे श्रेय विखेंचे ! १५ दिवसात कामाचा कार्यारंभ…

मागील वर्षी शिंदे- ‘फडणबीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री पद राधाकृष्ण विखे यांच्याकडे आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा खात्याचा संपूर्ण आढावा घेतला.

महावितरणची प्रलंबित असलेली कामे पुन्हा मार्गी लावण्यासाठी फडणवीस यांनी लक्ष घातले. त्याचाच भाग म्हणून पुणेवाडी वीज उपकेंद्राची निविदा पुन्हा नव्याने काढण्यात आली. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर खा. सुजयदादा विखे पा. यांच्याकडे ग्रामस्थांनी या प्रश्‍नाबाबत लक्ष वेधले.

खा. विखे यांनी १५ दिवसात कामाचा कार्यारंभ मिळवून दिला. त्यामुळे या कामाचे खरे श्रेय विखेंचेच आहे, असा दावा माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे यांनी केला आहे. रेपाळे यांनी सांगितले की, राज्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पुणेवाडी येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले होते. उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करण्यापासून सगळे सोपस्कार माझ्या सरपंच पदाच्या कारकिर्दीमध्ये पार पडले होते. पुढे आघाडी सरकारच्या काळामध्ये निविदा प्रक्रिया पार पडली.

निविदा प्रक्रिया पार पडूनदेखील सरकारच्या उदासिनतेमुळे कामाचा कार्यारंभ आदेश निघू शकला नाही. निविदा प्रक्रिया झाली असताना कामाची एजन्सी निश्चित होण्यासाठी आम्ही ग्रामस्थांसह महावितरण आणि शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. यासाठी राज्याचे तत्कालीन ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांना समक्ष भेटून हा प्रश्‍न तातडीने मार्गी लावावा, अशी विनंती ग्रामस्थांनी केली होती; परंतु त्यामध्ये आघाडी सरकारला अपयश आले.

काही लोकांनी काल-परवा याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. वीज उपकेंद्र तुमच्यामुळे आले असते तर ते आघाडी सरकारच्या काळातच आले असते. तुम्ही सत्तेमध्ये असताना आणि तुमच्याच पक्षाचे लोक संबंधित खात्याचे मंत्री असताना तुम्हाला काम मार्गी लावता आले नाही.

राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यामुळे आमचे उपकेंद्र मार्गी लागले. त्यामुळे तुमचे अपयश लपवून दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा तुमचा केविलवाणा प्रयत्न यातून दिसून येत असल्याचा आरोप माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे यांनी केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts