Ahmednagar News : राहुरीचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्यावर अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपात अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत राज्याचे अवर सचिव संजीव राणे यांनी तहसीलदार राजपूत यांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे.
अवर सचिव राणे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, चंद्रजित राजपूत तत्कालीन तहसीलदार,मालेगाव (जि. नाशिक, सध्या तहसीलदार, राहुरी) यांनी जून ते ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपात अनियमितता करून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३चे उल्लंघन केले आहे.
तहसीलदार राजपूत यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. यामुळे त्यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. राजपूत, हे निलंबन कालावधीत मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे असतील.
जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच त्यांना निलंबन भत्त्यासाठी खासगी नोकरी स्वीकारलेली नाही किंवा कोणताही खासगी धंदा वा व्यापार करीत नाही, असे प्रमाणपत्र द्यावे लागेल, असेही म्हटले आहे.