Ahmednagar News : मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. या दोन्ही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
रविवारी सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातील पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला होता तर मुळा धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, निळवंडेचा साठाही ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
या दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चालू मोसमात काही दिवसांचा अपवाद वगळता या परिसराला साजेसा पाऊस अद्यापही झालेला नाही. पावसाचे आगमन होण्यापूर्वी भंडारदरा धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांहून अधिक म्हणजेच ५ हजार ६९७ दलघफू इतका होता.
यानंतर वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्यात येत असल्याने पाणीसाठ्यात घट झाली होती. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर, साम्रद, रतनवाडी, उडदावणे, पांजरे या परिसरात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे धरणात नवीन पाण्याची आवक वाढत आहे.
रविवारी दिवसभरातील बारा तासांत भंडारदरा धरणात २०० दलघफू नवीन पाण्याची आवक झाली आणि पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला. सायंकाळी ११ हजार ३९ दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा ८ हजार ९९८ दलघफू इतका झाला होता.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरूच आहे. या धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. रविवारी सकाळी सहा वाजता कोतूळजवळील मुळेचा विसर्ग ६ हजार २२० क्युसेक इतका होता. मात्र, पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत असल्याने सायंकाळी हा विसर्ग कमी होत तो ४ हजार २२७ क्युसेक इतका झाला होता.
रविवारी सायंकाळी सहा वाजता या धरणातील पाणीसाठा ५० टक्यांपर्यंत म्हणजेच १२ हजार ९१० दलघफू इतका झाला होता. कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगांमध्ये पावसाचे सातत्य कायम आहे.
या परिसरातून येणारे अधिक भंडारदरा धरणाच्या खालील बाजूला असणाऱ्या ओढ्या- नाल्यांचे पाणी वाहत असल्याने निळवंडे धरणातही नवीन पाण्याची आवक सुरू असल्याने रविवारी पाणीसाठा ३ हजार २७२ दलघफू इतका झाला होता.