अहमदनगर बातम्या

पावसाने जिल्ह्याला झोडपले ; पाणलोटात झाला ‘इतका’ विक्रमी पाऊस

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या घाटघर येथे १७० मिमी, रतनवाडी १४० मिमी, पांजरे ८८ मिमी, भंडारदरा १५० मिमी. एवढा विक्रमी पाऊस झाला. शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला असल्याने धरणात पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

पाणलोटात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत असून भंडारदरा धरणातून शंभर टक्के पाणीसाठा ठेवून उर्वरित पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे.

सध्या जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस पडत असल्याने अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. शनिवारी दुपारी एक वाजल्यापासून भंडारदऱ्यातील स्पिलवेमधून २१ हजार ४२० क्युसेक्सने व वीज निर्मितीस जलविद्युत प्रकल्पासाठी ८०० क्युसेक्स यानुसार एकूण २२ हजार ५५० क्युसेक्सने विसर्ग प्रवरापात्रातून देण्यात आला.

दुपारी ३.३० वाजता वाजता भंडारदऱ्यातील स्पिलवेमधून विसर्ग वाढवून तो २२ हजार ९७६ क्युसेक्स करण्यात आला. पावसाचा जोर कायम असल्याने रात्रीतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रवरा नदीला मोठा पूर आला आहे. नदीवरील गावागावातील छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. तर नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अकोले शहरासह सर्व विभागात मुसळधार पाऊस सुरु आहे. तसेच निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निळवंडे धरणातून सायंकाळी ६ वाजता ७५६० दलघफू (९०.७७ टक्के) पाणीसाठा ठेवून २१ हजार ४२० क्युसेकने प्रवरा पात्रात विसर्ग सोडण्यात आला.

सकाळी ६ वाजल्यानंतरच्या १२ तासांत भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी घाटघर परिसरातून १७० मिलिमीटर, पांजरे येथे ८८ मिलिमीटर, रतनवाडीस १४० मिलिमीटर व भंडारदऱ्यात १५० मिलिमीटर पाऊस झाला.

या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदी दुधडी भरुन वाहत असल्याने रंधा धबधब्याने आक्राळविक्राळ रुद्र रुप धारण केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts