Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील बहुतांश भागात मागील दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पारगाव सुद्रिक येथे वीज कोसळल्याने घराची भिंत पडली
तसेच गोठ्यात बांधलेल्या गायीला विजेची झळ लागून गाय गंभीर जखमी झाली तर दुसऱ्या ठिकाणी नारळाच्या झाडावर वीज पडल्याने नारळाचे झाड जळून खाक झाले. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे काही भागात काढून ठेवलेला शेतकऱ्यांचा कांदा भिजला. मात्र, बहुतांश भागात पिकांना संजीवनी मिळाली.
शनिवारी (दि.११) दुपारी श्रीगोंदा शहरासह पारगाव सुद्रीक, घारगाव, कोळगाव, विसापूर, बेलवंडी आदी भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. श्रीगोंदा शहरात काही मिनिटांत रस्त्यांवर पाणी-पाणी झाले होते.
रविवारी पहाटे थिटे सांगवी, घोगरगाव शिवारात पाऊस झाला. तर सकाळी कोळगाव, पिंपळगाव पिसा, बेलवंडी बुद्रुक, एरंडोली, विसापूर आदी भागात जोरदार पाऊस झाला. तर तालुक्याच्या उर्वरित भागत हलक्या अथवा मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे कांदा उघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांची कांदा झाकण्यासाठी धावपळ उडाली. मात्र, तरकारी तसेच चारा पिकांना या पावसामुळे चांगलीच संजीवनी मिळाली आहे.
शनिवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यात पारगाव सुद्रिक येथील ग्रामपंचायत सदस्य संजय हरिभाऊ मडके यांच्या घराची भिंत विजेच्या कडकडाटाने पडली. तर विजेची झळ लागल्याने गोठ्यातील गाय भाजून गंभीर जखमी झाली.
तर पांडुरंग सप्ताळ यांच्या शेतातील नारळ झाडावर वीज पडल्याने नारळाचे झाड जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणती जीवितहानी घडली नाही.