Ahmednagar News : मुळा धरण पाणलोट क्षेत्रावर पावसाचा वर्षाव कमी-जास्त प्रमाणात सुरूच आहे. परिणामी संथ गतीने का होईना पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचे समाधान व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक जलसाठा क्षमता असणाऱ्या मुळा धरणाच्या निगराणी व पाणी वाटपासाठी मुळा पाटबंधारे विभाग सतर्क असतो. यंदाही धरण भरावे अशी अपेक्षा आहे. मुळा धरणामध्ये २६ हजार दलघफू क्षमतेने पाणी जमा झाल्यास शेतीसिंचनासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.
रविवारी सायंकाळी धरणाकडे ५ हजार ३२७ क्यूसेक प्रवाहाने नवीन पाण्याची आवक होत होती. २६ हजार दलघफू क्षमता असलेल्या मुळा धरणाचा साठा ६ हजार ४८० दलघफू इतका झाला आहे.
नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हरिश्चंद्रगडापासून मुळा नदीचा उगम होतो. ४० किमीचे अंतर पार करून मुळा नदीचे पाणी धरणाला लाभते. हरिश्चंद्रगड, कोतूळ, पांजरे, आंबीत, लहीत, साकूर मांडवे, पिंपळगाव खांड, घारगाव हे धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे.
मुळा धरणाच्या पाण्यावर शेती क्षेत्रासह नगर महापालिका, औद्योगिक वसाहत, राहुरी व देवळाली प्रवरा नगरपरिषद, सोनई, बारागाव नांदूर, वांबोरी-सडे, बुऱ्हाणनगर, कुरणवाडी, सुपा अशा महत्वाच्या ९ प्रादेशिक पाणी योजनांसह महात्मा फुले कृषी विद्यापीठाला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या मुळा धरणावर लाखो जणांची तहान अवलंबून आहे.
नगर दक्षिणेची भिस्त अवलंबून असलेल्या मुळा धरणामुळे लाखोंची तहान भागत असल्याने सर्वांच्या नजरा मुळा धरणाच्या पाणी साठ्याकडे लागलेल्या आहेत. दोन वर्षांपासून मुळा पाणलोट क्षेत्रावर पावसाने दडी मारली होती. परिणामी धरण साठा पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने चिंता व्यक्त होत होती.
दरम्यान महिन्याने का होईना मुळाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाचा धो धो वर्षाव पाहावसाय मिळत आहे. परिणामी तीन दिवसांपासून धरणाच्या पाणीसाठ्यात एकूण २२३ दलघफू नवीन पाण्याची वाढ झाली आहे.
पाणलोट क्षेत्रातील लहित खुर्द येथे मुळा दुथडी भरून वाहत असताना तेथून ५ हजार ३२७ क्यूसेकच्या विसर्गान धरणात पाणी जमा होत असल्याचे सांगण्यात आले.