Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यात सुरु असलेल्या अवैध गौण खनिजाचे उत्खनन व विक्रीबाबत आमदार लहू कानडे यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे लक्ष वेधले. महसूल विभागाने रात्रीची गस्त वाढवून याबाबतची तात्काळ कार्यवाही करावी, अशी सूचना आ. कानडे यांनी पत्राद्वारे केली आहे.
तालुक्यात काही सराईत मुरूम व वाळू माफिया ग्रामीण भागामधील अवैध उत्खनन करून विक्री करत आहेत. उदा १२ खोंगळ्याचा ओढा, टेलटॅक शेजारी, भोकर किंवा अशाच विविध ठिकाणचे स्पॉटवर गुंड प्रवृत्तीचे लोक स्थानिक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा व्यवसाय करत आहेत,
अशा तक्रारी गावोगावच्या नागरिकांनी केल्या आहेत. याबाबत सर्व सजातील कामगार तलाठी यांना सूचना देऊन त्यांच्या गावाअंतर्गत कुठे कुठे असे उत्खनन झाले. याची माहिती द्यावी.
तसेच त्यासाठी गावोगावच्या सरपंचांशी संपर्क करण्यास सांगावा, सदरच्या उत्खनन झालेल्या खड्ड्यांचे मोजमाप घेऊन अंदाजे किती गौणखनिज विनापरवाना उचलण्यात आले. याची माहिती मला ८ दिवसात देण्यात यावी,
अशा सूचना आ. कानडे यांनी केल्या आहेत. तसेच श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील नदीकाठच्या गावामधून रात्रीच्या वेळेस वाळूची वाहतूक सुरूच आहे.
याबाबत राहुरी तहसीलदार यांना मागील १५ दिवसांपूर्वी सुचविले होते. श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरु झाला आहे. त्यामुळे रात्रीची गस्त वाढवून याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरु करावी, अशी सूचनाही आ. कानडे यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.