Ahmednagar News:अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात फिर्यादीतर्फे बाजू मांडणारे वकील अॅड. सचिन पटेकर यांनी घातपातीची भीती व्यक्त केली आहे.
आपण चालवत असलेल्या खटल्यांतील आरोपी अगर त्यांच्या समर्थकांकडून जीवाला धोका आहे. त्यामुळे आपल्याला निशुल्क पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.
रेखा जरे हत्याकांड, पारनेर तालुक्यातील आरोपी राहुल गोरख साबळे याने घडवून आणलेले खून प्रकरण आणि जवळा येथील अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार व खून या प्रकरणांत अॅड. पटेकर मूळ फिर्यादीच्यावतीने हे सरकारी वकिलांना सहाय करीत आहेत.
या खटल्यांचा निकाल होईपर्यंत शासनाकडून मला पोलिस संरक्षण देण्यात यावे. अगर या तिन्ही प्रकरणांच्या केसच्या तारखांच्या दिवशी मला निःशुल्क पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी अॅड. पटेकर यांनी केली आहे.