Ahmednagar News : एका धर्माबद्दल एका मुलाने पोस्ट टाकल्याच्या कारणावरून श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथील एका शाळेमध्ये दोन गटातील मुलांमध्ये थेट हाणामाऱ्याचा प्रकार घडला.
यामुळे आता धर्मांधतेचे लोन थेट शाळेपर्यंत पोहचल्याचे दिसून येत असून यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात येत असल्याचे दिसत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, एका विशिष्ट समाजाबद्दल एकाने पोस्ट टाकली याचा राग येवून शाळेमध्ये दोन्ही गटाच्या मुलांमध्ये हाणामाऱ्या झाल्या. यावेळी एका महापुरूषाच्या शाळेतील फोटोचाही काहींकडून अवमान करण्यात आला.
त्यामुळे काहीकाळ एकच खळबळ उडाली. शाळेतील हा प्रकार पाहून विद्यार्थ्यांचे पालक त्या ठिकाणी जमले. त्याठिकाणी दोन्ही बाजूच्या मुलांना पालक, शिक्षकांनी समजून सांगितले
परंतू तत्पूर्वी शाळेतील महापुरूषांच्या फोटोचा अवमान तसेच वर्गातील पताका फाडण्यात आल्याने याठिकाणी वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र त्यानंतर महापुरुषांच्या फोटोचे दर्शन घेवून आता पुन्हा असे प्रकार होणार नाही,
असे एकमताने ठरवून या वादावर पडदा पाडण्यात आला. परंतु, या प्रकारामुळे धर्माधर्मातील द्वेषाचे लोन आता थेट ग्रामीण भागात शाळेतील मुलांपर्यंत जाऊन पोहचल्याने सामाजिक सलोख्याच्यादृष्टीने हा प्रकार गंभीर असून त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची गरज असल्याची चर्चा आहे.
श्रीरामपूरमध्ये नुकताच लहान मुलाचा धर्मांतरणाचा प्रकार समोर आला होता. बळजबरीने एकास धर्मांतरण करण्यास लावल्याचा आरोप सदर मुलाच्या नातेवाईकांनी केला होता. या प्रकरणावरूनही काही काळ वातावरण चांगलेच तापले होते.