Ahmednagar News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे श्रीरामपूर तालुक्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात तसेच उसाच्यावाढीसाठी कोणतेही योगदान नाही.
त्यामुळे ‘अशोक’च्या सभासद शेतकऱ्यांनी प्रवरा व संगमनेर कारखान्यास ऊस न देता आपल्या भागाची कामधेनू असणाऱ्या अशोक कारखान्यासच ऊस पुरवावा, असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले आहे.
मुरकुटे यांनी पत्रकात म्हटले, की मी व आपल्या अनेक सहकाऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी संघर्ष केला. आंदोलने व चळवळी केल्या. प्रसंगी तुरुंगवास पत्करला. माझ्या आमदारकीच्या काळात प्रवरा व गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून या भागातील पाणी वाढविले.
शासकीय बंधारे, पाझर तलाव, गावतळे आदींद्वारे पाणी उपलब्धता वाढविली. अशोक कारखाना माध्यमातून कार्यक्षेत्रातील ओढ्या नाल्यांवर अशोक बंधाऱ्यांची मालिका उभारुन कार्यक्षेत्रातील पाणी उपलब्धता वाढविली. या सर्वांमुळे कार्यक्षेत्रातील ऊसाच्या उपलब्धतेत ३६ हजार टनावरुन १२ लाख टनापर्यंत वाढ झाली.
या ऊसावर प्रवरा व संगमनेर कारखान्याचा डोळा आहे. आपली आमदारकीची सत्ता गेल्यावर आपले बारमाहीसह सर्व ब्लॉक रद्द झाले. आता सात नंबर अर्जाद्वारे मेहरबानीचे पाटपाणी घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
याचप्रमाणे शेती महामंडळाच्या हरेगाव व टिळकनगर शेतमळ्यांचे ब्लॉक रद्द केले गेले. त्यामुळे हजारो एकर क्षेत्राचे पाणी या क्षेत्राच्या व आजुबाजूच्या परिसरात जीरत होते, ते पाणी गेले. हे पाणी प्रवरा परिसरात अनधिकृत उपसासिंचन योजनांद्वारे वापरले जात आहे.
संगमनेरमध्ये सत्तेच्या जोरावर निळवंडे ते ओझरदरम्यान प्रोफाईल वॉल बांधून आपल्या भागाचे पाणी ओझर बंधाऱ्याच्या वरच अडवून वापरले जात आहे. त्यामुळे या कारखान्यांना ऊस देणे योग्य ठरते का, याचा विचार आपल्या भागातील शेतकऱ्यांनी करावा.
आपल्या भागाची कामधेनू असलेल्या अशोक कारखान्याचे जतन केले पाहिजे. अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव बाहेरून ऊस आणून या भागाची कामधेनू असणारा अशोक कारखाना चालवावा लागेल, असे मुरकुटे म्हणाले.