अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- कोरोना कालावधीत नियम आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले नियम मोडून कर्जत-जामखेड मतदारसंघात तेथील लोकप्रतिनिधीच विविध कार्यक्रम आयोजित करीत आहेत. आतापर्यंत असे तीन वेळा झाले आहे.
त्यामुळे कर्जत-जामखेड वगळून हे नियम आहेत का? तसे नसेल तर तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का?’, असा सवाल भाजप प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी कर्जत-जामखेडमधील विविध कार्यक्रमांकडे लक्ष वेधून हा आरोप केला. शिंदे म्हणाले, ‘नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात २२ ते २८ नोव्हेंबरपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहितामधील कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करून जमावबंदीचा आदेश दिला आहे.
असे असले तरी कर्जतमध्ये आमदार पवार यांनी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बंदी आदेश असूनही असा कार्यक्रम कसा घेता येईल? त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली जाणार का? की या आदेशातून कर्जत-जामखेडला वगळले आहे? याचा खुलासा प्रशासनाने करावा.
आमदार पवार यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी करोना काळातही त्यांनी अनेकदा नियम मोडले आहेत. बंदीचा आदेश लागू असताना खर्डा येथे किल्ल्यासमोर भगवा झेंडा उभारण्यासाठी मोठा कार्यक्रम घेतला होता.
तिन्ही वेळा आमदार पवार यांच्यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता प्रशासनाने यासंबंधीची भूमिका जाहीर करावी,’ अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.