अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Ahmednagar News : कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित यांचे वडील राजेंद्र पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे.
पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचे आज नाशिकमध्ये राज्यपालांच्या हस्ते वितरण होत आहे.
मात्र, कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. राज्यपाल कोश्यारी यांनी फुले दाम्पत्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधाने केली.
राज्यपाल हे महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि अस्मितांवर कारण नसताना घाला घालत आहेत. हा पुरस्कार मला जाहीर झाला याचा आनंद आहे, मात्र हा पुरस्कार राज्यपालांच्याऐवजी कृषी कर्मचाऱ्यांच्या हस्ते कृषी कार्यालयात स्वीकारेन, अशी भूमिका पवार यांनी घेतली आहे.
राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे सांगताना राजेंद्र पवार म्हणाले की, “ज्यांना केवळ आमचा इतिहास वादात ढकलायचा आहे, आमच्या अस्मितेचा पोरखेळ करायचा आहे अशा महान व्यक्तीच्या हातून हा पुरस्कार घ्यावा एवढा मोठा मी नाही.
उलट या पुरस्काराचा मान राखून तो आज त्यांच्या हस्ते न स्विकारता ज्या कृषी खात्याने दिला त्यांच्याच हस्ते,त्यांच्या कार्यालयात जाऊन स्वीकारणे माझ्यासाठी अधिक प्रशस्त होईल.” असे ते म्हणाले.