अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News:- व्यवसायासाठी आर्थिक संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची नियमीत फेड केली नाही, वारंवार तगादा केल्यानंतर दिलेला धनादेशही खात्यात शिल्लक नसल्याने वठला नाही या कारणावरुन संगमनेरातील उद्योजिका मीता आशिष संवत्सरकर यांना चार महिन्यांचा कारावास आणि अडीच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
सात दिवसांत भरपाई न दिल्यास अतिरीक्त दोन महिन्यांचा कारावासही सुनावण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, युनियन बँक ऑफ इंडिया (पूर्वीची कॉर्पोरेशन बँक) या बँकेच्या संगमनेर शाखेतून संगमनेरातील स्पृहा कलेक्शन या महिलांच्या वस्त्रांचे दालन चालवणार्या मीता आशिष संवत्सरकर यांनी साडेसात लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.
मात्र या कर्जाची त्यांच्याकडून नियमीत परतफेड झाली नाही. त्यामुळे बँकेने संबंधित कर्जदारावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेत सदरचे प्रकरण न्यायालयात दाखल केले.
यावेळी न्यायालयाने स्पृहा कलेक्शनच्या संचालिका मीता आशिष संवत्सरकर यांना दोषी धरुन त्यांना चार महिन्याच्या कारवासाची शिक्षा सुनावली. तसेच युनियन बँकेला (पूर्वीची कॉर्पोरेशन बँक) पुढील सात दिवसांत 2 लाख 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
मुदतीत भरपाई रकमेचा भरणा न केल्यास अतिरीक्त दोन महिन्यांचा कारावास भोगावा लागेल.