अहमदनगर बातम्या

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात संततधार; भात लागवडींना वेग, धरणात नवीन पाण्याची आवक सुरु

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात तसेच परिसरामध्ये संततधार सुरू झाली असून भात लागवडींना पुन्हा एकदा जोमाने वेग आला आहे. भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्येही नवीन पाण्याची आवक जोमाने सुरू असून भंडारदरा धरण ३६.३५ टक्के भरले आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गेले दोन ते तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे भात लागवडी थांबल्या होत्या; मात्र शुक्रवारी मध्यरात्रीपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात संततधार सुरू झाली आहे. भात खाचरे पाण्याने तुडुंब भरल्याने पुन्हा एकदा परिसरात भात लागवडींना वेग आला आहे.

डोंगरावरील फेसाळणारे पाणी धरणाच्या पोटामध्ये जात असल्यामुळे भंडारदरा धरणात नवीन पाण्याची पुन्हा आवक सुरू झाली आहे. भंडारदरा धरण शनिवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ३६.३५ % भरले होते.

यंदा राज्यात वेळेवर मान्सूनचे आगमन होवूनही जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणाला मात्र त्याची प्रदीर्घ प्रतिक्षा करावी लागली. जूनचा संपूर्ण महिना रुसलेल्या पावसाचे पाणलोटात जोरदार पुनरागमन झाले. भंडारदर्‍याच्या पाणलोटातील घाटघर, रतनवाडी, पांजरे, उडदावणे अशा सर्वदूर गेल्या चार दिवसांपासून तुफान जलवृष्टी होत असल्याने खपाटीला गेलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा वेगाने वाढत आहे.

वीक एंडचे औचित्य साधत शनिवारी, रविवारी भंडारदऱ्याला असंख्य पर्यटकांनी भेट दिली. कोलटंबेजवळील वसुंधरा फॉल, बाहुबली धबधबा, नान्ही फॉल, नेकलेस फॉल, सांदण दरीचा रिव्हर्स फॉल, पांजरे फॉल या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील धबधब्यांना पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात भेट दिली.

गत २४ तासांमध्ये भंडारदरा या ठिकाणी १४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून घाटघर येथे ६६ मिलिमीटर पाऊस पडला. पांजरे येथे ५९ तर रतनवाडी येथे ६१ मिलिमीटर पाऊस पडला. २४ तासांमध्ये भंडारदरा धरणात २१२ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली.

कळसुबाई शिखरावरही पावसाची संततधार सुरू असल्याने वाकी धरणावरून १९७ क्युसेकने पाणी कृष्णावंती नदीमध्ये वाहत आहे. शनिवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ४०१३ दशलक्ष घनफूट झाला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts