Ahmednagar News : दैवाचा खेळ कधी कुणाला समजत नाही असे म्हटले जाते. कधी कुणावर कसे संकट कोसळेल हे सांगता येत नसते. असेच संकट कोसळले आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील २१ वर्षीय दीपक अशोक नवले या तरुणावर.
विजयादशमीनिमित्त आयोजित रावण दहन कार्यक्रमात रावणाच्या तोंडात लावलेली तोफ उडून कापड दुकानात काम करणाऱ्या दीपकच्या अंगावर आली. त्यात त्याचा एक डोळा निकामी झाला. एका डोळ्याचा दुष्परिणाम दुसऱ्या डोळ्यावरही होऊ लागला आहे.
आता हा डोळा वाचवण्यासाठी दिपकची लढाई सुरु आहे. या डोळ्यावरील शस्त्रक्रियेसाठी दीपकला आर्थिक मदतीची गरज आहे.
दीपक हा आपल्या वडिलांसमवेत बेलवंडी येथे राहतोय. आईचे छत्र लहानपणीच हरपले. सध्या तो बीएस्सी मध्ये शिकत असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी तो अर्धवेळ कापड दुकानातही कामास येतो. रावणदहन कार्यक्रमावेळी त्याला डोळ्याला जखम झाल्याने दोन महिने त्याच्यावर उपचार केले गेले परंतु त्याचा डावा डोळा कायमस्वरूपी निकामीझाला.
उजव्या डोळ्याचे इन्फेक्शन वाढल्याने तो देखील निकामी होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केलीये. त्यामुळे त्याच्यावर कायमस्वरूपी औषधोपचार करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. परंतु यासाठी साधारण दरमहा ८ ते १० हजार रुपये खर्च येणार असून आर्थिक अडचणीने तो हतबल झाला आहे.
तो जे कमावतो त्यात फक्त घरखर्च आणि शिक्षण खर्च भागवतोय, पण उपचारासाठी मात्र त्याला पैशांची अडचण उभी राहिली आहे. सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, राजकीय पदाधिकारी यांनी दीपक याला मदत करावी असे आवाहन ग्रामस्थ करत आहेत.