रेशनकार्ड हे सर्वसामान्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण कागदपत्र. या कागदपत्राशिवाय अनेक कामे खोळंबून राहतील. दरम्यान या रेशनकार्डसंबंधित अनेक कामांसाठी नागरिकांना सेतू कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असतात.
लग्नानंतर शिधापत्रिकेतील पत्त्यामध्ये बदल करणे, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा कारणांसाठी महिला गर्दी करीत आहेत. आता या सर्वांसाठी एक खुशखबर आहे. तुम्हाला थेट सेतू कार्यालयात जाऊन गर्दी करण्याची गरज नाहीये.
तुम्ही आता घरबसल्या पब्लिक लॉगिनद्वारे रेशनकार्डमध्ये बदल करू शकता. राज्य सरकारने शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत लाभार्थ्यांना क्यूआर कोड आधारित ई-शिधापत्रिका सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अंत्योदय अन्न शिधापत्रिका, प्राधान्य कुटुंब योजना व राज्य योजनेअंतर्गत, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अशा सर्व शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना विनामूल्य ही सुविधा देण्यात आली आहे.
यामध्ये नागरिकांना नवीन शिधापत्रिकेकरिता अर्ज करणे, शिधापत्रिकेतील पत्त्यामध्ये बदल करणे, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा शिधापत्रिकाविषयक सेवा ऑनलाइन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत पब्लिक लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
असा घ्या फायदा
सर्वांत प्रथम https://rcms.mahafood.gov.in/ या लिंकवर जावे लागेल. साइनअपद्वारे नवीन रेशनकार्ड तयार करण्यासाठी खाते तयार करा. यानंतर आधार क्रमांकवरील सर्व माहिती भरून नवीन खाते तयार करा. यासाठी मोबाइल क्रमांक आधारकार्डशी लिंक असावा लागतो.
रजिस्ट्रेशन
रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर लॉगिन करा. यानंतर डॅशबोर्डवर सर्व तपशील भरा. सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपले रेशनकार्ड मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे जाते.
दाखल केलेला प्रस्तावाची स्थिती लॉगिन करून तपासून पाहू शकता. अर्ज मंजूर झाल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीचे ई- रेशनकार्ड उपलब्ध होईल.