राज्याचे माजी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज दुःखद निधन झाले. २३ वर्ष पत्रकारिता करताना त्यांचा व स्व. खासदार बाळासाहेब विखे यांचा माझा फक्त एकदा संबंध आला मात्र तो क्षण मी आजही मी विसरू शकत नाही. ज्या तालुक्यात आपल्याला २००१ साली कोणतेही राजकारण करायचे नाही व कधीही मते मागायची नाही त्या पाथर्डी तालुक्यासाठी या दोघांनी दिलेले योगदान आज सुद्धा माझ्या दृष्टीने कुतूहलाचा विषय आहे.
१६ जानेवारी २००१ ला तालुक्यातील कोठेवाडी येथील काही महिलांवर सामूहिक अत्याचार झाले होते. या घटनेच्या बातम्या विविध वृत्तपत्रात २१ जाने. च्या वृत्तपत्रात ठळकपणे छापून आल्या नंतर काळाच्या ओघात समाजातून अनेक मदतीचे हात पुढे आले व त्यांनी अत्याचारित कुटुंबाला मदत केली.
ती करताना काहींनी आपली नावे वृत्तपत्रात छापून येण्यासाठी मोठी धडपड केली. मदत करताना फोटोग्राफर सुद्धा सोबत ठेवला. पत्रकारांना पाथर्डी ते कोठेवाडी जाण्या येण्यासाठी चारचाकी वाहनांची सोय सुद्धा केली. मदत करणाऱ्या काही महिलांनी अत्याचारित महिलांना मदत करताना ओठावरील लिपस्टिक पुन्हा पुन्हा लावली व फोटोसेशन केले.
हे सर्व घडत असताना ज्या दिवशी अत्याचाराच्या बातम्या वृत्तपत्रात छापून आल्या त्याच दिवशी सायंकाळी साधारणतः सहा च्या सुमारास माझ्या कडे कोपरगाव चे पत्रकार सुरेश रासकर हे थेट माझ्या घरी आले. त्यांनी मी साहेबा सोबत आलो असून आपल्याला कोठेवाडील जायचे आहे असे सांगत मला घराबाहेर बोलावले.
कोणते साहेब आले म्हणून मी पेठेत उभ्या केलेल्या त्यांच्या पांढऱ्या अँबिसेंटर गाडीजवळ गेलो असता गाडीत शंकरराव कोल्हे दिसले. अंगात बंडी व धोतर असा त्यांचा पेहराव. साहेब घरात या आपण चहा घेऊ अशी विनवनी त्यांना मी केली मात्र त्यांनी नकार देत मला त्यांच्या गाडीत बसवले.
२५ मिनिटाच्या प्रवासात कोल्हे यांनी माझ्या कडून घटना कशी घडली,नेमका काय अत्याचार झाला,इतका क्रूर अत्याचार कोणी केला असावा याची सर्व माहिती घेतली.आम्ही तिघे कोठेवाडी ला पोहचल्या नंतर कोल्हे साहेबानी सर्व अत्याचारित कुटुंबाची भेट घेत सर्वांच्या वेदना समजून घेतल्या.खायला धान्य राहिले नाही व अंगावर जे कपडे घालायचे ते दरोडेखोरांनी जाळून टाकले असल्याचे अत्याचारित कुटुंबाने कोल्हे यांना सांगितले.
ज्या डोंगराच्या पायथ्याला असलेल्या वाड्यात महिलांवर अत्याचार झाला तो डोंगर अंधारात उतरत कोल्हे साहेबानी पहिला. कोल्हे साहेब अस्वस्थ आहेत हे माझ्या लक्षात सुद्धा आले. त्यामुळे अत्याचारित महिलांच्या कुटुंबाला कोल्हे साहेब काहीतरी मदत करतील अस मला वाटत होते मात्र त्या क्षणी तरी माझा अपेक्षाभंग झाला.
कोणतेही आश्वासन न देता आम्ही परत गाडीत बसलो व पाथर्डीकडे निघालो, परतीच्या प्रवासात कोल्हे साहेब एकही शब्द बोलले नाही. पाथर्डीच्या स्टॅण्डवर मला सोडण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली. मी येतो म्हणून गाडीच्या खाली उतरलो अन पाठोपाठ ते सुद्धा गाडीतून खाली उतरले.रासकर यांना टाळून त्यांनी मला बाजूला घेतले.
मी उद्या कोठेवाडीतील अत्याचारित कुटुंबाला मदत पाठवत असून कृपया ही मदत त्यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही कोठेवाडील दुपारी जाऊन थांबा व अत्याचारित कुटुंबाला मी पाठवलेली मदत पोहोच करा अशी मला विनंती केली. कोल्हे साहेबांची अत्याचारित कुटुंबाला मदत अशी बातमी छापता येईल म्हणून मी पण होकार दिला
मात्र दुसऱ्याच क्षणी कोल्हे यांनी मला विनंती केली. मी जी मदत उद्या पाठवेल त्याची कृपया कुठल्याही पेपर ला बातमी देऊ नका व कोठेवाडीच्या ग्रामस्थांना सुद्धा ही मदत मी पाठवली ते कळवू देऊ नका. त्यांचे आभाळ फाटलेले आहे,माझ्या किरकोळ मदतीने त्यांचे दुःख हलके होणार नाही त्या मुळे कृपया बातमी छापूच नका अशी विनंती त्यांनी मला केली व ते कोपरगाव ला रवाना झाले.
दुसऱ्या दिवशी दुपारी एक च्या सुमारास त्यांनी धान्य,रग,साड्या,साखर याने भरलेली एक ट्रक कोठेवाडीला पाठवली.ट्रक पाथर्डीला आल्यावर ड्रायव्हर चा मला फोन आला. साहेबानी तुमचा नंबर दिला असून तुम्ही आमच्या सोबत चला. या ट्रक सोबत दुचाकीवर मी सुद्धा कोठेवाडीला गेलो.
मदत घेऊन जी माणसे आली त्यांनी मदत वाटली व ते आले तसे परत गेले. कोठेवाडी ग्रामस्थांना मिळालेली ती पहिली मदत होती. कुठल्याही पेपरला या मदतीच्या बातमीची ओळ छापून आली नाही व ही मदत कोणी केली हे त्यांना सुद्धा त्या वेळी समजले नाही. ज्या दिवशी कोल्हे साहेबानी मदत केली त्याच वेळी दुपारी आणखी एक ट्रक कोठेवाडीला आला.
त्या मध्ये सुद्धा कपडे,धान्य,साखर व संसार उपयोगी साहित्य होते. हे सर्व साहित्य अत्याचारित कुटुंबाला देण्यात आले मात्र ते देत असतानाही ही मदत कोणाची आहे हे कोठेवाडीकरांना समजले नाही. माझ्यातील पत्रकार जागा झाला अन मी माझ्या पदतीने ही मदत कोणी पाठवली याची माहिती घेतली असता स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे यांनी हि मदत पाठवल्याचे मला समजले.
जी दक्षता शंकरराव कोल्हे यांनी घेतली होती तीच दक्षता विखे पाटील यांनी घेतली होती. एका हाताने दिलेले दान दुसऱ्याला कळू नये या संस्कृतीचे पालन या दोघांनी केले.काळाच्या ओघात कोठेवाडीचे पुनर्वसन झाले. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कोठेवाडीला भेट देत मोठी मदत केली. ती करताना मोठा गाजावाजा सुद्धा केला.
वृत्तपत्रात त्याच्या बातम्यासुद्धा आल्या मात्र दोन बातम्या कधीच आल्या नाहीत त्या म्हणजे कोल्हे व विखे यांनी केलेली मदत.दुर्दैवाने आज दोन्हीही नेते हयात नाही मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते .एक डझन केळ व दोन डझन बिस्किटचे पुडे वाटताना त्याची बातमी वृत्तपत्रात यावी म्हणून अनेकजण धडपड करतात मात्र कोल्हे व विखे यांनी या दोन्हीही गोष्टी टाळत आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवले हे निश्चित.या दोन्हीही नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
लेखक : उमेश मोरगावकर मोबा. ९८५० ७८ ९८५०