शिर्डी ग्रीन अँड क्लिन शिडी फाऊंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १३ फेब्रुवारीपासून शिर्डी महापरिक्रमा २०२५ हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर शिर्डी महापरिक्रमेचा उद्घोषणा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह परिसरातील असंख्य नागरिक व भाविक उपस्थित होते.
माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते महापरिक्रमेची विधिवत उद्घोषणा करण्यात आली. याप्रसंगी त्यांनी महापरिक्रमेच्या माध्यमातून अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. तसेच या कार्यक्रमादरम्यान भजनांच्या सुरेल तालावर तयार झालेल्या आनंदमय वातावरणात मान्यवर आणि ग्रामस्थांसमवेत सहभाग घेत पाहुली या पारंपरिक नृत्याचा आनंद घेतला व सोहळ्याची रंगत वाढवली.
शिर्डी महापरिक्रमेचे वैशिष्ट्य म्हणजे गव्हाच्या पिकांची पाहणी आणि चित्रीकरण करणे. त्यामुळे सोहळ्यास उपस्थित सर्वांनी शिर्डी परिक्रमेच्या निमित्ताने शेतांमधील गव्हाच्या पिकांची पाहणी केली. तसेच परिक्रमेदरम्यानच्या दृश्यांचे चित्रीकरणदेखील करण्यात आले. त्याद्वारे या अनोख्या परंपरेचा अनुभव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.
या सोहळ्याला श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिरीष वमने (उपविभागीय पोलीस अधिकारी), महंत काशिकानंदजी सरस्वती महाराज, ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे अजित पारख, तसेच अभय शेळके, गोपीनाथ बापू गोंदकर, विजयराव जगताप, दिगंबर कोते, अॅड. अनिल शेजवळ, गणेश कोते, डॉ. जितेंद्र शेळके, नितिन शेळके,
प्रताप जगताप आदींनी हजेरी लावली. यावेळी डॉ. सुजय विखे यांनी शिर्डी महापरिक्रमा हा उपक्रम केवळ धार्मिक सोहळा नसून, तो सामाजिक एकात्मता आणि निसर्गप्रेमाचा संदेश देणारा सोहळा आहे, असे स्पष्ट केले. तसेच सर्व उपस्थितांनी शिर्डी महापरिक्रमेला भविष्यात अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या संकल्पाने कार्यक्रमाची सांगता केली.