Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहाटेच्या दरम्यान धावायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे घडली. प्रसाद कारभारी सोनवणे असे या युवकाचे नाव आहे.
पहाटेच्या दरम्यान मुळा उजवा कालव्याच्या बाजूला तो धावत होता. यावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला व त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
अधिक माहिती अशी : प्रसाद हा कारभारी सोनवणे ब्राह्मणीतील शेतकरी कारभारी सोनवणे यांचा मुलगा आहे. दोन ते तीन किलोमीटर रनिंग करण्याचा त्याचा नित्यक्रम असायचा. भरती व्हायचे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून व्यायाम,
रनिंग आदी करणे हा त्याचा दिनक्रम असायचा. नेहमीप्रमाणे सकाळी उठून रनिंगला गेला व मुळा उजवा कॅनॉलवर ऍटॅक आला. तो जागीच कोसळला होता.
त्याच्या पाठीमागून येणाऱ्या एकाला तो तिथे पडलेला दिसला. त्याने त्याच्या कुटुंबियांना याची माहिती दिल्यानंतर वडील व भाऊ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रसादला तातडीने राहुरी येथे रुग्णालयात उपचारासाठी नेले होते
परंतु वैद्यकिय आधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. प्रसाद याचे महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात शिक्षण सुरु होते व भरती होणे हे त्याचे उद्दिष्ट होते. परंतु त्याच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.