Ahmednagar & Maharashtra News :प्रदीर्घकाळ चाललेल्या एसटी कामगारांच्या संपकाळात एसटीची धुरा सांभाळून तिला रुळावर आणलेल्या ८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर महामंडळाने धक्का दिला.
आज, शनिवारपासून कंत्राटी चालकांची सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे पडत्या काळात एसटीला साथ दिलेल्या या कंत्राटी चालकांवर ऐन गणेशोत्सवात बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यानी २७ ऑक्टोबर २०२१पासून संप केला. या काळात प्रवासी वाहतूक सुरळीत राहणे आणि कर्मचाऱ्यांचा संप चिरडून टाकण्यासाठी महामंडळाने टप्याटप्याने एकूण ८०० चालकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली होती.
एप्रिल २०२२ मध्ये संप मिटल्यावर कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले. यावेळी कंत्राटी चालकांना मुदतवाढ देण्यात आलेली होती. पुढे या नियुक्तीला सातत्याने मुदतवाढ देण्यात आलेली होती.
सध्या महामंडळात कंत्राटी चालकांचा नगण्य वापर होत असल्याने ३ सप्टेंबरपासून कंत्राटी चालकांचा वापर बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे,
असे आदेश शुक्रवारी महामंडळाच्या वाहतूक विभागाकडून काढण्यात आले आहेत. याची माहिती या कर्मचाऱ्यांना पूर्वीच देण्यात आलेली असल्याचा दावा एसटीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.