Ahmednagar News : शेतातून गेलेल्या विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन शेतात उभा असलेला आणि काढणीला आलेला दोन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारात असलेल्या सुभाषवाडी परिसरात घडली आहे. या आगीमुळे दोघा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सारोळा कासार येथील बाळासाहेब दशरथ कडूस व त्यांचे बंधू कै. किसन दशरथ कडूस यांच्या नावावर असलेल्या गट नं. ५३५ मधील शेतात रविवारी (दि.३१) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यांच्या शेतातून वीज वाहिनी गेलेली असून,
वीज वाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या उडाल्या व त्या शेतात उभ्या असलेल्या उसावर पडल्याने उसाने तात्काळ पेट घेतला. धुराचे प्रचंड लोट सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी जळणाऱ्या उसाकडे धाव घेतली.
आगीचा वेग जोरात असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. यात शेतकरी कडूस बंधूंचा यांचा दोन एकर ऊस जळाला. या दोन्ही शेतकऱ्यांचे त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दुष्काळात पाण्याची कमतरता असताना कसेबसे जगवलेले उसाचे पीक ऐन तोडणीस आले असताना
विजेच्या शॉर्टसर्किटमुळे डोळ्यादेखत जाळून खाक झाल्याने यामध्ये मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीसमोर असताना या ओढवलेल्या संकटांमुळे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यावर सोमवारी (दि.१) कृषी सहाय्यक पूनम दिवे, तलाठी शिवम भालेराव, ग्रामसेविका मीना जाधव, यांनी झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. महावितरणचे अभियंता संदीप बराट व वीज कर्मचाऱ्यांनीही पाहणी करून पंचनामा केला. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबीय, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कडूस, डॉ. श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.