Shrirampur News : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील रामसिंग उर्फ भाऊ गहिरे यांच्या मुंबादेवी वडापाव नाष्टा व भेळ सेंटर या हॉटेलला शनिवारी रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली होती.
त्यात हॉटेलच्या साहित्यासह फ्रीज, भांडी, टेबल, शेगडी, तंबाखूची पोती, कोल्ड्रिंकच्या बाटल्यांचा, इतर उपवासाचे पदार्थांसह कुरकुरे, बिस्किट बॉक्स, पत्रे, शटर, पाण्याच्या बाटलीचे अनेक बॉक्स, अशा विविध वस्तू जळून खाक झाल्या.
या आगीत जवळपास सव्वा ते दीड लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागली की, आणखी वेगळं काही कारणाने याविषयी
तर्कवितर्क लावले जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाऊ गहिरे हे नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान हॉटेल बंद करून आपल्या घरी जेवणासाठी गेले. त्यानंतर असलेल्या तासभराने बाजुला असलेल्या वैभव जगताप या लहान मुलाने ग्रामस्थांना कळविले.
त्यानंतर ग्रामस्थांनी हॉटेल मधुन जाळ व धुराचे लोळ येत असल्याचे पाहताच क्षणात अनेक ग्रामस्थ पाणी घेऊन आग विझवण्यासाठी धावले. मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्याने आणि दुकान बंद असल्याने पाणी फेकुन सुद्धा वरच्या वरच पाणी पत्र्यावरच पडत होते.
आतील आग कमी होत नव्हती, म्हणून काही तरुणांनी शटरचे कुलूप तोडून शटर उघडले असता, हॉटेलमधील सर्वच वस्तु उग्र स्वरूपात पेटलेल्या होत्या.
तर स्प्राईटच्या बाटल्या फटाफट फुटून त्यातुन हवा निघुन त्याचा मोठा आवाज येत असल्याने ग्रामस्थांनी घाबरत का होईना शर्थीचे प्रयत्न करून ठिक-ठिकाणावरून पाणी आणून आग आटोक्यात आणली.
दरम्यान, कामगार तलाठी अविनाश तेलतुंबडे यांनी रितसर पंचनामा केला असून यामध्ये डिप फ्रीज, टेबल, शटर, पत्रे, कुरकुरे पाकिट, पाणी बॉक्स, बिस्किट व इतर अनेक वस्तुसह अंदाजे दीड लाखाच्या आसपास नुकसान झाल्याचा अहवाल वरिष्ठाकडे पाठविला असल्याचे कामगार तलाठी तेलतुंबडे यांनी सांगितले.