Ahmednagar news : संगमनेर शहर व तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तालुक्यातील १४ भंगार गोडाऊन व दुकानांची काल एकाच वेळी तपासणी केली. या तपासणीमध्ये पोलिसांना काही संशयास्पद वस्तू आढळल्या आहे.
संगमनेर तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून मोटर सायकल चोरी, शेतकऱ्यांची शेती अवजारे, शेतीपंप, केबल चोरी, बॅटरी या वस्तूंची चोरी होत आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या आहे.
चोरट्यांकडून चोरी केलेले साहित्य हे संगमनेर शहर व परिसरातील विविध भंगार दुकानांमध्ये अत्यल्प किंमतीमध्ये घेतले जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर व तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील १४ भंगार दुकाने व गोडाऊनवर एकाच वेळी पोलिसांची १४ पथके पाठविण्यात आली.
तपासणी करण्यात आलेल्या १४ भंगार दुकानांमध्ये मिळून आलेल्या संशयास्पद वस्तूंचे पंचनामे करण्यात आले. संबंधित भंगार दुकानाचे चालक-मालक यांना लेखी विचारणा करण्यात येणार असून त्यांचे खुलासे समाधानकारक प्राप्त न झाल्यास त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, विठ्ठल पवार यांच्यासह संगमनेर शहर पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला