अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- राजकारणात महिलांनी पुढे येऊन राष्ट्रवादीच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचे काम करावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गावपातळीवर महिलांचे संघटन वाढवत आहे. प्रत्येक गावात महिला अध्यक्ष नेमावेत.
तसेच महिलांची बूथस्तरीय रचना बळकट करून शरद पवारांचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले.
राष्ट्रवादी शहर व जिल्हा महिला काँग्रेसच्या मेळाव्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चाकणकर बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक, पक्षनिरीक्षक वर्षा शिवले, प्रदेश उपाध्यक्ष निर्मला मालपाणी, जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड, शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे आदी उपस्थित होते.
चाकणकर म्हणाल्या, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेली ५२ वर्षे समाजाचे विविध प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. पुरुषांबरोबरच महिलांना योग्य पदांचा सन्मान मिळवून दिला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळवून दिल्यामुळे महिलांना महापौर, जिल्हा परिषद अध्यक्षा, नगराध्यक्ष आदी पदांवर काम करण्याची संधी मिळाली.
या अनुभवामुळे आज महिला विधानसभा व संसदेत आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. युवतींना शिक्षणात सवलती देण्याचे काम केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम केले आहे.