निसर्गाचा लहरीपणा सर्वांच्या परिचयाचा होता. परंतु आता वातावरणातील अनियमितपणा देखील यंदा नागरिक अनुभवत आहेत. वातावरणात सारखे बदल होत आहेत. कधी ऊन, कधी पाऊस, तर कधीमधी बोचरी थंडी असे अनियमित, विषम वातावरण पाहायला मिळत आहे.याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण वाढले असून जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. खासगी दवाखान्यांत देखील रुग्णांची गर्दी वाढलेली आहे.
गारपीट, धुक्याने वाढले श्वसनाचे आजार
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला. त्यात गारपीट देखील झाली. वारा, पाऊस आणि गारपीट थंडी वाढली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले त्यांतून डासांची उत्पत्ती वाढली. यातच भर की काय पहाटे दाट धुके पडत आहे. त्यामुळे श्वसनाचे त्रास वाढले आहेत. सर्दी, खोकला आदी आजारात वाढ झाली आहे.
दमटपणा वाढल्याने बळावतोय आजार
मागील काही दिवसांचा अभयास केला तर श्वसनविकाराच्या आजारात वाढ दिसते. लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्दी आणि खोकल्याचा त्रास सध्या सुरु आहेत. ग्रामीण भागात यावर घरगुती उपाययोजना लोक करत आहेत. ऋतूबदलानंतर थंडी असायला हवी. परंतु थंड वातावरणात दमटपणा असल्यामुळे श्वसनाचे विकार वाढत असल्याचे तज्ञ सांगतात.
बहुतांश आजार श्वसनासंदर्भात
नागरिकांमध्ये आताच्या पिरियडमध्ये जे आजार आहेत ते दमा, अस्थमा, शिंका येणे, नाक गळणे, डोकेदुखी, ब्रॉन्कायटिस असे श्वसना संदर्भात आजार आहेत. ज्या नागरिकांना पूर्वीपासून श्वसनाच्या व्याधी आहेत त्यांच्यामध्ये आजार अधिक प्रमाणात असल्याचे दिसते. विषम वातावरणामुळे हे आजार वाढत असल्याचे चित्र आहे.
‘सारी’ च्या अनुशंघाने प्रशासन सतर्क
चीनमध्ये लहान मुलांमध्ये बळावलेल्या श्वसनविकाराच्या आजाराच्या (सारी) पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितलं की, चीनमध्ये लहान मुलांमध्ये बळावलेल्या श्वसनविकाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून महत्वपूर्ण सुचना आलेल्या असून त्यापद्धतीने आता कार्यवाही आम्ही सुरु केली आहे. जिल्ह्यात सध्या सारीचे रुग्ण नसले तरी देखील काळजी घेण्यात येत असल्याचेच ते म्हणालेत.