अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :-परतीच्या पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने जिल्ह्यात रब्बी हंगामातील काही पिकांच्या पेरण्या उशीरापर्यंत सुरू आहेत. यामुळे मागील 15 दिवसांपूर्वी ज्वारीच्या पेरणी झालेल्या क्षेत्रात वाढ झाली असून हे क्षेत्र 77 हजारांपर्यंत वाढले आहे.
हंगामात आतापर्यंत 1 लाख 91 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या असून त्याची टक्केवारी 26 टक्के आहे. जिल्ह्यात अद्याप पाहिजे तेवढी थंडी पडण्यास सुरूवात झाली नसली तरी हरभरा आणि गव्हाच्या पेरणीला सुरूवात झाली आहे.
जिल्ह्यात 642 हेक्टरवर गव्हाची आणि 4 हजार 514 हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झालेली आहे. गहू आणि हरभरा पिकांचे भवितव्य हे थंडीवरच अवलंबून राहणार आहे.
कृषी विभागाने जिल्ह्यात 1 लाख 53 हजार हेक्टरवर हरभरा पिकाचे तर 57 हजार हेक्टरवर गहू पिकाचे नियोजन केलेले आहे. मात्र, ज्वारी पिकाची प्रत्यक्षात पेरणी कमी झाल्याने ज्वारीचे क्षेत्र गहू,
हरभरा आणि कांदा पिकांकडे वळणार आहे. याचसोबत जिल्ह्यात नवीन ऊस लागवडीचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत 48 हजारांच्या जवळपास ऊसाचे क्षेत्र पोहचले असून त्यात मोठी वाढ अपेक्षीत आहे. कांदा पिकांचे क्षेत्र देखील वाढत असून 45 हजार हेक्टरपर्यंत कांदा लागवड झालेली आहे.