Ahmednagar News : सोयाबीन दराने यंदाची निच्चांकी पातळी गाठली आहे. नगरसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गत दोन महिन्यांपासून सोयाबीनला प्रतिक्विंटल अगदी चार हजार रुपये इतकाच दर मिळत आहे.
सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ६०० रुपये आहे. आता त्याच्याही खाली हे दर पोहोचले आहेत. जवळपास मागील दोन महिन्यांपासून सोयाबीन दरात सुधारणा झाली नसून पीक विम्याचाही लाभ मिळत नसल्याने नेवासा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
एकीकडे कमी पर्जन्यमान आणि पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनात घट नोंदवली गेली. अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नव्हता. उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल साठवून ठेवण्याला पसंती दिली होती. मात्र, दुसरीकडे तालुक्यात सर्वाधिक पिकाचे क्षेत्र असणाऱ्या सोयाबीन, कापसाच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत होती.
त्यामुळे शेतकरीही निराश झाले होते. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तर सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली गेल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणखी नुकसान झाले. सध्या शेतमालाची साठवणूक केलेले शेतकरी हे दरवाढीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. मात्र, दोन महिन्यानंतरही दरात कोणतीच सुधारणा दिसून येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आजही सोयाबीनचा दर चार हजार रुपयांच्या आसपास आहे.
एकीकडे भाव तर दुसरीकडे विम्याची समस्या याने नागरिक त्रस्त आहेत. खरीप हंगामातील पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे नेवासा तालुक्यातील आठ महसूल मंडळांपैकी फक्त चार मंडळांतच खरिपाचा अग्रीम मंजूर करण्यात आला होता.
त्या मंडळात २५ टक्क्चे अग्रीम वाटपही करण्यात आले. मात्र, उर्वरित चार मंडळांतही पावसाचा मोठा खंड पडूनही या मंडळांना अग्रीमसाठी डावलण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक शेतकऱ्यांनी नुकसानाच्या तक्रारी केल्या.
पीक विमा कंपनीने नुकसानाचे पंचनामे केले आहेत. मात्र, अजूनही शेतकऱ्यांच्या पदरात पीक विम्याचा लाभ आलेला नाही.