Ahmednagar News : घटस्फोटास आई जबाबदार असल्याचा संशय आल्याने मुलाने आईचा गळा चिरून निर्घृण खून केला. त्यानंतर घराला कुलूप लावून तो पसार झाला,
खडकीतील रेंजहिल्स परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी खडकी पोलिसांनी आईची हत्या करणाऱ्या मुलाला शिर्डीमधून बेड्या ठोकल्या आहेत.
गुंफाबाई शंकर पवार (वय ५५, रा. मुठे वडगाव, ता.श्रीरामपूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून त्यांच्या मुलाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
ज्ञानेश्वर शंकर पवार (वय २९, रा. रेंजहिल्स, खडकी कॅन्टोन्मेंट फॅक्टरी) असे अटक करण्यात आलेली आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार,
ज्ञानेश्वर हा रेंजहिल्स येथील खडकी कॅन्टोन्मेंट फॅक्टरीत काम करत होता व त्याचा साधारण चार ते पाच वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मधील मुठे वडगाव येथे त्याची आई कुटुंबासह राहत होती.
मुलगा पुण्यात नोकरीस असल्याने ती त्याला भेटण्यासाठी तेथे जात असे. मुलाने बोलावले म्हणून आई मुलाच्या घरी गेली होती.
आई घरी आल्यानंतर तीच त्याच्या घटस्फोटास जबाबदार असल्याचा संशयातून त्याने आईचा धारदार हत्याराने गळा चिरून खून केला. त्यानंतर ज्ञानेश्वर याने घराला बाहेरून कुलूप लावले व तो पळून गेला.
गुंफाबाईच्या कुटुंबीयांनी त्यांना तसेच ज्ञानेश्वर यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन लागत नसल्याने महिलेच्या कुटुंबीयांनी घरी जाऊन चौकशी केली.
तेथे त्यांना ज्ञानेश्वरच्या घराला कुलूप दिसले. परंतु गुंफाचाईच्या चपला दारातच असल्याने त्यांना शंका आली. त्यामुळे नातेवाइकांनी खिडकीतून डोकावून आत कानोसा घेतला असता त्यांना रक्त पडलेले दिसले.
त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांच्यासह वरिष्ठ अधिक घटनास्थळी धाव घेत दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करताच त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गुंफाबाई दिसल्या. पोलिसांनी शोध मोहीम राबवत ज्ञानेश्वर याला शिर्डीतून ताब्यात घेतले.