साप म्हटला की, भीतीने भल्या भल्यांची गाळण उडते. घरात, परिसरात कुठेही साप निघाला, तर त्याला अनेक जण मारतात. मात्र, संगमनेर तालुक्यातील रहिमपूरमध्ये आढळलेल्या सापाला मारण्याची मुभा येथील शिंदे आडनावाच्या कुटुंबीयांना नाही.
शिंदे आडनावाच्या घरी साप निघाला, तर त्याला मारण्यासाठी इतर आडनावाच्या व्यक्तीला बोलवावे लागते. त्यामुळे येथे पाहुण्यांच्या हातून साप मारण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. त्याचा संदर्भ नागपंचमी या सणाशी असल्याने ही परंपरा जपण्याचे काम येथील ग्रामस्थ करत आले आहेत.
सण म्हटला की गोडधोड जेवण आणि त्या सणाचे असलेले महत्त्व, त्या अनुषंगाने जपलेली त्या प्रत्येक सणांची परंपरा. तालुक्यातील रहिमपूर येथील नागपंचमी सणाची परंपरा अशीच आगळीवेगळी अन् जगावेगळी आहे. त्याची अख्यायिका जगावेगळीच असल्याने हा सण इतर सणांच्या तुलनेत रहिमपूरकरांसाठी वेगळा आहे.
श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा हवे तर, पण येथील जनतेने पूर्वापार चालत आलेली ही परंपरा अखंडितपणे जपली आहे. त्यामुळे येथील नागपंचमी सणांची चर्चा जिल्ह्यात सगळीकडे ऐकायला मिळते. प्रत्येक सणाचे त्याचे त्याचे एक वेगळे महत्त्व आहे. जसे दिवाळीला लक्ष्मीपूजनाचे, बैलपोळ्याला बैल पूजनाचे, तसेच नागपंचमीला नागदेवतेला अर्थात गावात किंवा शेतात असणाऱ्या वारूळ पूजनाचे महत्त्व आहे.
या सर्व गोष्टी येथे केल्या जातातच, मात्र वैशिष्ट्यपूर्ण असलेली बाब म्हणजे नागपंचमीच्या सणाला येथील लोक तळत नाहीत. त्यामुळे भजे, कुरडईचा खमंग स्वाद घेता नाही. केवळ पुरणाची पोळी आणि सार, एवढ्यावरच या सणाचा आनंद घेता येतो. कारण, येथे नागपंचमीच्या सणाला हे पदार्थ करीत नाहीत.
केवळ पुरणपोळीचा नैवेद्य वारुळाला देण्यात येतो, तसेच रहिमपूर आणि परिसरातील शिंदे आडनाव असणारे लोक नागपंचमीच्या सणाच्या दिवशी कुठलीच कामे करीत नाहीत. आदल्या दिवशीच जनावरांसाठी लागणारा चारा कापून ठेवतात. कारण, नागपंचमीच्या दिवशी चारा कापायचा नाही, असा अलिखित नियमच पूर्वापार चालत आलेला आहे.
त्याचबरोबर लिहायचे, शिवायचे, तोडायचे अशी कुठलीही कामे या दिवशी करता येत नाहीत. वर्षभरात कुठेही साप निघाला, तर या सापाला मारण्याची मुभा या शिंदे आडनावाच्या कुटुंबीयांना नाही, कारण साप हा शिंदे आडनावाच्या लोकांचा भाऊबंद लागत असल्याची आख्यायिका जुने लोक सांगतात.
त्यामुळे कोठेही साप निघाला, तर या सापांना मारण्यासाठी वेगळ्या आडनावाच्या माणसाचा शोध घ्यावा लागतो. त्यामुळे येथे पाहुण्या हाती साप मारून घेण्याची अखंडित परंपरा आतापर्यंत चालत आली आहे. बालगोपाळांसाठी हवा असणारा झोकाही आदल्या दिवशीच बांधून ठेवावा लागतो. शिंदे आडनावाच्या लोकांचे बघून आता परिसरात असणाऱ्या इतर आडनावांचे लोकही ही परंपरा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.
श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा, पण पूर्वपार चालत आलेली ही रीत रहिमपूरकर मोठ्या भक्तीभावाने व आनंदाने पुढे नेत असल्याने हा एक चर्चे चा भाग बनला आहे. या दिवशी येथील जनतेला कोणतीच कामे नसल्याने परिसरातील तरुण वर्ग एक दिवसाची पिकनिक आयोजित करून त्याचा आनंद घेतात. त्यामुळे नागपंचमीचा सण म्हणजे रहीमपूरकरांचा वार्षिक सुट्टीचा सण असल्याचे नागरिक मोठ्या गंमतीने सांगतात.