Ahmednagar News : कोरडगाव, पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परिसरात काल (दि. २४) रोजी अचानक आलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीचा धांदल उडाली. या पवसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील कोरडगाव, जिरेवाडी, सोनोशी, तोंडोळी, कळसपिंप्री, औरगंपुर, कोळसांगवी, मुखेकरवाडी, दैत्यनांदुर, आगसखांड, निपाणी जळगाव, फुंदे टाकळी, परिसरात सध्या बाजरी, गहू, कांदा काढणीचे काम चालु आहे.
बुधवार क्षदि. २४) रोजी सकाळपासून पावसाचे कुठलेही बातावरण नव्हते किंवा उष्णता ही नव्हती; परंतु दुपारपासून अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास जोरदार पाऊस झाला, या पवसामुळे शेतातील बाजरी, गहू, कांदा पिकांना सुरक्षित करण्यासाठी बळीराजाची त्रेधात्रिपट उडाली.
अचानक आलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेवटी हाती आलेलं पिक, त्याच झालेलं नुकसान पाहुन बळीराजा हवालदिल झाला आहे. शासनाने अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.