अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकजण कालानुरूप बदल करत वेगवान प्रगती करत आहे. त्यात शिक्षण ही बाब अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
जितके आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शिक्षण घेतले जाईल तेवढी प्रगती अधिक असे समीकरण असताना देखील जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात चिमुकले आजही झाडाखालीच बसून शिक्षण घेत आहेत.
हे खूप मोठे दुर्दैव आहे. या बाबत मात्र पालकांनी आक्रमक भूमिका घेत शाळेसाठी इमारत उभी करा अन्यथा ही शाळाच बंद करा अशी थेट भूमिका घेतली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी,तालुक्यातील अकोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वर्गखोल्या उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना झाडाखाली शिक्षण घ्यावे लागत आहे.
येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी पर्यंत प्राथमिक शाळा असुन विद्यार्थी पटसंख्या २०७ असुन १८३ विद्यार्थी उपस्थित होते.आठ शिक्षक कार्यरत असुन एक पद रिक्त आहे.
शाळेची कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता पुर्वीची इमारत जुनी झाल्याने निर्लेखन करून दोन वर्षापुर्वी पाडली आहे. एकुण पाच वर्गखोल्या मंजुर आहेत. बांधकाम पुर्ण करण्याचा कालावधी प्रत्येक वर्गखोली साठी एक वर्षाचा आहे.
सबंधित ठेकेदारास कार्यारंभ आदेश दिलेले असुन कामे सुरू आहेत. मात्र अद्याप एकाही वर्गखोलीचे बांधकाम पुर्ण झालेले नाही. ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीने स्थानिक विद्यालयाकडे मागणी करून वर्गखोल्याची काही दिवस तात्पुरत्या स्वरूपात सोय केली.
मात्र स्थानिक विद्यालयांच्या दहावी व बारावीच्या परिक्षा यावर्षी शाळेतच होणार असल्याने त्यांना त्यांच्या वर्गखोल्याची गरज आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी वर्गखोल्याच उपलब्ध नसल्याने शाळेच्या आवारातच झाडाखाली शाळेचे वर्ग भरवुन कुठल्याही सुविधांअभावी जमीनीवर मातीत बसवुन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे.