Ahmednagar News : नेवासा शहरात गुरूवारी (दि.२३) नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता नगरपंचायत चौक येथे मराठा-कुणबी आरक्षणच्या मुद्द्द्यावर मनोज जरांगे यांची जाहीर सभा होत आहे.
अखिल महाराष्ट्रातून मनोज जरांगे यांनी केलेल्या मराठा आरक्षणाच्या मांडणीला सर्व समाजाच्या स्तरांमधून पाठिंबा मिळत आहे. नेवासा तालुक्यातून सकल मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते स्वयं स्फूर्तीने सभा यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत.
या सभेला लोकांचा मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता नेवासा शहरामध्ये सुमारे ३० ते ४० हजार लोकांचा जनसमुदाय असण्याची शक्यता आहे. या जाहीर सभेचे सकल मराठा समाजाच्या स्वयंसेवकांकडूनही काटेकोर नियोजन सुरू आहे.
येणाऱ्या नागरिकांची बैठक व्यवस्था ही नगरपंचायत नेवासा पासून तीनही बाजूला जाणाऱ्या हम रस्त्यांवर केलेली आहे. महिला भगिनींसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे.
बाजार तळ नेवासा या ठिकाणी तसेच बस स्टॅन्ड नेवासा या ठिकाणी पिण्याच्या स्वच्छ व फिल्टर पाण्याचे टँकर तैनात ठेवण्यात येणार आहे.
सभास्थानी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची व्यवस्था विविध ठिकाणच्या वाहन तळावर केलेली आहे. श्रीरामपूर रोड वरून येणारी वाहने ही रामलीला मंगल कार्यालयाच्या प्रांगणामध्ये वाहन तळामध्ये ठेवली जातील. तसेच रामलीला समोरील शेत जमिनीत केलेली आहे. अतिरिक्त वाहनांसाठी मराठी शाळा व विश्वेश्वरनाथ बाबा विद्यालयाची क्रीडांगणे उपलब्ध करून दिली जातील.
राहुरी रोड कडून येणारी वाहने ही ईदगाह मैदान, उस्थळरोड वरील गोशाळा तसेच खंडोबा मंदिरासमोरील प्रांगण या ठिकाणी वाहन तळ करून उभी केली जातील. नगर रोड कडून येणाऱ्या वाहनांना नेवासा येथील इज्तेमा मैदान, राधाकृष्ण मंगल कार्यालय परिसर तर खडका फाट्यावरुन येणाऱ्या वाहनांसाठी मार्केट कमिटीच्या प्रांगणामध्ये वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मनोज जरंगे पाटील यांचे बेलपिंपळगाव फाटा, पुणतगाव फाटा, पाचेगाव फाटा, साईनाथ नगर, नेवासा बुद्रुक फाटा, राजमुद्रा चौक नेवासा फाटा या ठिकाणी अखिल मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. नेवासाच्या सभेला येण्यापूर्वी ते संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान येथे ते पैस खांबाचे दर्शन घेतील.
त्यानंतर ते सभेला संबोधित करतील व शेवगाव कडे जाण्यासाठी मार्गक्रमण करतील. भेंडा येथे सकल मराठा समाज ग्रामस्थांच्या वतीने त्यांना व त्यांच्या सहकार्यांना दुपारचे भोजन, फराळ दिला जाणार आहे. त्यानंतर कुकाणे येथे त्यांचे स्वागत होऊन ते शेवगाव येथील सभेसाठी मार्गस्थ होतील.